एक देश, एक भाषा! अमित शहा यांनी केले हिंदी भाषेचे समर्थन

799
amit-shah-01

जो देश आपली भाषा विसरतो, त्याचे अस्तित्वही शिल्लक राहत नाही. आपली भाषा न वाचवू शकणाऱया देशाची संस्कृतीही लोप पावते. एक देश, एक भाषा हे सूत्र देशाला समानतेच्या धाग्यात बांधून ठेवते, त्यामुळे हिंदी भाषेला सशक्त करणे गरजेचे असल्याचे स्पष्ट प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. दरम्यान, अमित शहा यांच्या भूमिकेला दाक्षिणात्य राज्यांनी लगेचच विरोध केला आहे.

राष्ट्रीय हिंदी दिवसाच्या निमित्ताने बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एक देश, एक भाषा या भूमिकेचे जोरदार समर्थन केले. देशाची भाषा एकच असली पाहिजे, जेणेकरून परदेशी भाषांना स्थान मिळणार नाही असे ते म्हणाले. यामुळेच स्वातंत्र्य चळवळ सुरू असतानाच राजभाषेची संकल्पना मांडण्यात आली आणि हिंदीला तो दर्जा देण्यात आला. मात्र काळाच्या ओघात हिंदी भाषेचे महत्त्व कमी झाले आणि परदेशी भाषांचा पगडा वाढला असे सांगून अमित शहा म्हणाले, जो देश आपली भाषा सोडतो, त्याचे अस्तित्वही शिल्लक राहत नाही. त्यासाठी हिंदी भाषेला बळ दिले पाहिजे, तिच्या व्याकरणात सुधारणा करून ती नव्या युगाची भाषा बनवली पाहिजे.

दाक्षिणात्य राज्यांतून विरोधाचा सूर
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मांडलेल्या एक देश, एक भाषा या सूत्राला दाक्षिणात्य राज्यातून तात्काळ विरोध झाला. द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनी आमच्यावर हिंदी लादपण्याचा प्रयत्न झाल्यास देशाच्या एकतेवर त्याचा वाईट परिणाम होईल असा इशारा दिला. शहा यांनी आपले विधान मागे घ्यावे अशी मागणीही त्यांनी केली. एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी यांनी हिंदी ही हिंदुस्थानची मातृभाषा नसल्याचे तारे तोडले. देशाची विविधता नष्ट करण्याचे काम अमित शहा करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. एमडीएमकेचे प्रमुख वायको यांनीही हिंदी लादल्यास देशाची पुन्हा एकदा फाळणी होईल अशी धमकी दिली. मात्र पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या भूमिकेचे स्वागत केले असून सर्व भाषांचा सन्मान केला पाहिजे असे त्या म्हणाल्या.

1937 पासून तामीळनाडूत विरोध
हिंदीला राजभाषेचा दर्जा देण्यास तामीळनाडूचा 1937 पासून विरोध आहे. 1963 मध्ये संसदेत मांडण्यात आलेल्या राजभाषा विधेयकाला द्रमुक नेते अण्णादुराई यांनी कडाडून विरोध केला. राजभाषा विधेयक मंजूर होताच तत्कालीन मद्रास राज्यात हिंसेचा भडका उडाला. मदुराई शहरात भयंकर दंगल झाली.

आपली प्रतिक्रिया द्या