
‘केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व मंत्री धर्मेंद्र प्रधान हे विरोधी पक्षाच्या उमेदवारांना धमकावत आहेत. उमेदवारी मागे घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकत आहेत. असे करून भाजपने आमच्या तीन उमेदवारांना निवडणुकीतून माघार घ्यायला भाग पाडले गेले,’ असा गंभीर आरोप जनसुराज पार्टीचे अध्यक्ष प्रशांत किशोर यांनी केला. किशोर यांनी भाजप नेत्यांच्या तावडीत सापडलेल्या एका उमेदवाराचे फोटोही पत्रकार परिषदेत दाखवले. त्यांच्या या आरोपांमुळे बिहारमधील राजकारण तापले आहे.
‘जागा कोणाच्याही कितीही येवोत, सरकार आम्हीच बनवणार असा भाजपचा नेहमी दावा असतो. मात्र यावेळी जन सुराज पक्षाने त्यांना हादरा दिला आहे. त्यांचा आत्मविश्वास डळमळला आहे. पराभवाच्या शक्यतेने भाजप बिथरला आहे. त्यामुळे त्यांच्याकडून दबावतंत्र सुरू झाले आहे,’ असे किशोर म्हणाले. धर्मेंद्र प्रधान यांनी आमच्या तीन उमेदवारांवर दबाव टाकला, असे किशोर म्हणाले.
आमच्या उमेदवाराला अर्ज भरू दिला नाही!
दाणापूर येथे भाजपने जन सुराज पक्षाचे उमेदवार अखिलेश पुमार ऊर्फ मुतूर शाह यांना अर्ज भरण्यापासून रोखले. त्या उमेदवाराला दिवसभर भाजप नेत्यांच्या सोबत ठेवले. स्वतः अमित शहा हे त्या उमेदवारासोबत होते. आरजेडीने अखिलेश पुमार यांचे अपहरण केले अशी चर्चा घडवून आणली गेली. प्रत्यक्षात आमचा उमेदवार भाजपच्या नेत्यांच्या पैदेत होता. निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घ्यायला हवी. गृहमंत्री पदावरचा माणूस विरोधकांच्या उमेदवाराला कसा अडवू शकतो, असा सवाल त्यांनी केला.
लोकशाहीच्या चिंधडय़ा उडवल्या जात आहेत. विरोधकांच्या उमेदवारांना खुलेआम धमक्या दिल्या जात आहेत. त्यांना घरात कोंडले जात आहे. हे सगळं करणारे स्थानिक नेते नाहीत, गुंड किंवा मवाली नाही. हिंदुस्थान सरकारचे मंत्री आहेत.