
पैशांच्या जोरावर विरोधी उमेदवारांना धमकावून स्वत:चे उमेदवार बिनविरोध निवडूण आणण्याचा प्रताप सत्ताधारी महायुतीने केल्याने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या सर्व राजकीय गोंधळात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी सोलापूरात एका मनसे पदाधिकाऱ्याची हत्या करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. मनसे नेते अमित ठाकरे यांनी सोलापूरात जाऊन मृत मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी अमित ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. एक दिवस प्रचार सोडा आणि इथे या, असं आवाहन अमित ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना केले आहे.
“महापालिका निवडणुकांमध्ये पैसे देऊन फॉर्म परत घेण्यापर्यंत ठीक होतं. मात्र, उमेदवारी मागे घेण्यावरून आता खून होऊ लागले आहेत. मी जसं बघितलं तस एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी बघाव. अशा निवडणुका असतील तर नको आम्हाला निवडणुका, आम्ही सगळे फॉर्म परत घेतो तुम्हीच जिंका अशा निवडणुका. तुमचं राज्य कुठे नेऊन ठेवलंय हे तुम्हाला कधी कळणार आहे की नाही? अशा शब्दात अमित ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना खडा सवाल केला आहे.
“देवेंद्र फडणवीस यांना माझी विनंती आहे, एक दिवस प्रचार सोडा आणि इथे या, निवडणुका कोणत्या पातळीला नेऊन ठेवल्यात आहेत हे तुम्हालाही कळेल. देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहे, आपलं राज्य कुठे चाललं आहे हे त्यांनी पाहिलं पाहिजे. एक आई, दोन मुली आज अस्थिविसर्जन करून आल्या आहेत. ही कोणती परिस्थिती आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली पाहिजेत. बाळासाहेबांना न्याय मिलाला पाहिजे.” अस अमित ठाकरे म्हणाले आहेत. तसेच मृत बाळासाहेब सरवदेंच्या मुलींच्या शिक्षणाचा खर्च मी करणार असल्याचही यावेळी अमित ठाकरे म्हणाले.


























































