महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.अमोल कोल्हे यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातून 1 लाख 57 हजार 467 मतांनी विजय मिळवल्यानंतर मंचर शहरात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. फटाक्यांची आतिषबाजी करत एकमेकांना लाडू भरविण्यात आले. नेत्यांच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या.
सकाळी मतमोजणीला प्रारंभ झाला तेव्हा पहिल्या फेरीपासून डॉ. कोल्हे यांनी आघाडी घेण्यास सुरुवात केली. त्यांनी आढळराव पाटील यांच्यावर निर्णयक आघाडी घेतल्यानंतर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते एकत्र येऊ लागले. मंचर शहराच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात येऊन फटाक्याची आतिशबाजी करण्यात आली. एकमेकांना लाडू भरवून विजयाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे तसेच ज्येष्ठ नेते शरद पवार व खासदार अमोल कोल्हे यांच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी बोलताना पुणे जिल्हा संघटक राजाराम बाणखेले म्हणाले, खासदार कोल्हे यांना आंबेगाव तालुक्याने चांगली साथ दिली आहे. राष्ट्रवादी काग्रेसच्या जुने जाणत्या कार्यकर्त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना साथ देत खासदार कोल्हे यांना मतदान केले आहे. पवार व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सहानुभूती असल्याने कोल्हे यांना भरघोस मतदान झाले आहे. विशेष म्हणजे शिवसैनिकांनी जीव तोडून काम केले आहे. हे चित्र यापुढेही कायम राहणार असून ही आगामी विधानसभेच्या विजयाची नांदी आहे. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे दत्ता गांजाळे, मंचर शहर प्रमुख विकास जाधव, महिला आघाडीच्या सुरेखा निघोट, चंद्रकला पिंगळे, विनोद घुले, महेश घोडके, अजित मोरडे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे बाळासाहेब बाणखेले, दादाभाऊ थोरात, दिनेश गवळी, अमोल शेलार तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.