
अमरावती जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. मध्यरात्री चहा पिण्यासाठी घराबाहेर पडलेल्या बडनेरा येथील सात मित्रांच्या कारला बेलोरा विमानतळाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून तीन मित्र मृत्यूशी झुंज देत आहेत. अमरावती-अकोला महामार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, बडनेरा जुनी वस्ती येथील सात तरुण सोमवारी मध्यरात्री चहा पिण्याच्या बेताने बेलोरा विमानतळ परिसरातील एका हॉटेलकडे निघाले होते. चहा पिऊन परतत असताना बेलोरा विमानतळाजवळ चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव कार रस्त्याशेजारील एका झाडावर जोरात जाऊन आदळली. ही धडक इतकी भीषण होती की कारचा चक्काचूर झाला आणि चार मित्रांचा जागीच मृत्यू झाला.
मोहम्मद अनस मोहम्मद सईद (वय – 20), मोहम्मद तल्हा मोहम्मद अनीस (वय – 22), मोहम्मद अवेझ मोहम्मद सईद (वय – 26) आणि अब्दुल अनवेस अब्दुल सलीम (वय – 22) अशी मृतांची नावे आहेत. अपघातात मृत्यू झालेले सर्व तरुण बडनेरा येथील रहिवासी आहेत. या भीषण अपघातात अन्य तीन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने अमरावती येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे कळते
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच बडनेरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. प्राथमिक अंदाजानुसार कार अनियंत्रित झाल्याने हा अपघात घडला असावे असे मसोर आले आहे. पोलिसांनी या परिसरात असलेले सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून अधिक तपास सुरू आहे.




























































