
एसएनडीटी विद्यापीठातून शिकलेल्या आणि देशभरात विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थिनांच्या ‘पेनिट्रेटिंग डिलिरियम’ या कलाविष्काराने साऱयांचे लक्ष वेधून घेतले. यानिमित्ताने महिलांच्या जीवन संघर्षाचे वास्तव कॅनव्हासवर उमटले. स्त्रियांसमोरील आव्हाने, विवाह, करीअर, नोकरी करताना त्यांना आलेले अनुभव रेखाटण्यात आले.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने वरळी येथील नेहरू सेंटर कलादालनामध्ये हे प्रदर्शन 5 मार्चपासून भरवण्यात आले होते. प्रदर्शनात 30 माजी विद्यार्थिनींची 60 हून अधिक चित्रे मांडण्यात आली होती. एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव यांच्या हस्ते तसेच प्राचार्य डॉ. जास्वंदी वांबुरकर यांच्या उपस्थितीत प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. भरतनाटय़म नृत्याच्या माध्यमातून कल्याणी जाणतीकर यांनी अनोखे प्रतिबिंब साकारले. अंकिता माधुरीने शिल्पांमध्ये दडलेले सौंदर्य उलगडले. चित्रकार श्रद्धा शेटे हिने घराबाहेर पडून मोकळा श्वास घोण्याची भावना चित्रातून मांडली. सोनी पाल हिने स्त्रियांच्या जीवनातील संघर्ष अत्यंत मार्मिकपणे मांडला, तर अंकिता सावंतने शहराच्या ठिकाणी दिव्यांग व्यक्तींची हेळसांड, त्यांच्या वेदना रेखाटल्या.






















































