वसमत तालुक्यातील अडगाव रंजे येथे आज बुधवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास तलाठी कार्यालयात घुसून एकाने तलाठ्याचा डोळ्यात मिरची पूड टाकून चाकूने भोसकून खून केल्याची घटना घडली.
वसमत तहसील कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या आडगाव रंजे येथील तलाठी कार्यालयात संतोष पवार हे तलाठी म्हणून कार्यरत आहेत. दैनंदिनप्रमाणे आज बुधवारी तलाठी संतोष पवार हे कार्यालयात कर्तव्यावर हजर होते. दरम्यान, दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास बोरी सावंत येथील एक तरुण दुचाकीवरून कार्यालयात आला होता. यावेळी तलाठी संतोष पवार व त्याच्यामध्ये वादावाद झाली. त्यानंतर तरुणाने संतोष पवार यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून चाकूने पोटात, मांडीवर वार करून दुचाकीवरून सावंगी रोडकडे भरधाव वेगात पळून गेला. या घटनेनंतर आजूबाजूच्या नागरिकांनी कार्यालयाकडे धाव घेतली.गंभीर जखमी झालेल्या संतोष पवार यांना परभणी येथील उपजिल्हा रुग्णालयाकडे नेले जात असताना त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. परभणी येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच हट्टा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संग्राम जाधव, जमादार कावरखे, कासले, लाखाडे, महेश अवचार यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी मारोती थोरात, तहसीलदार शारदा दळवी, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पोलिसांनी एका तरुणास संशयित म्हणून ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले. मात्र, याप्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झाला नव्हता.