एतिहाद एअरवेजमध्ये हिंदुस्थानी व्यक्तीला मिळाली अविस्मरणीय क्षणांची अनुभूती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एतिहाद एअरवेजमध्ये एका हिंदुस्थानीला एका अविस्मरणीय अनुभवाची अनुभूती मिळाली. त्या व्यक्तीने केलेली एक साधी विनंती, अविस्मरणीय अनुभवामध्ये बदलली आहे. वंश मोटवानी नामक या व्यक्तीने फ्लाइट अटेंडंटला नम्रपणे विचारले की, मला कॉकपिटला भेट देण्याची काही संधी आहे का? फ्लाइट अटेंडंट सुरुवातीला सावधपणे प्रतिसाद देते, कारण सुरक्षिततेच्या कारणास्तव विमानात अशा विनंत्यांना सहसा परवानगी नसते. नंतर मात्र ती त्याला आश्वासन देते की, विमानाने जमिनीवर लॅंड केल्यानंतर, त्याला काॅकपिटला भेट देता येईल. तिने दिलेल्या शब्दाप्रमाणे विमान उतरल्यावर मोटवानीला कॉकपिटमध्ये प्रवेश दिला जातो, जिथे तो वैमानिकांना भेटतो आणि त्यांच्याशी हस्तांदोलन करतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vansh Motwani (@vanshmotwani23)

हा हृदयस्पर्शी संवाद, तसेच एअरलाइन कर्मचाऱ्यांच्या या कृतीने सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मोटवानीने एअरलाइन आणि तिच्या कर्मचाऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या कॅप्शनसह हा व्हिडिओ शेअर केला. या अद्भुत अनुभवासाठी मी एतिहादचा नेहमीच आभारी राहीन. या फ्लाइटमधील प्रत्येक कर्मचारी खूप दयाळू आणि प्रेमळ होता, त्यांनी माझा अनुभव १०० पट अधिक चांगला बनवला, असे त्याने लिहिले.

या पोस्टला लगेचच चांगला प्रतिसाद मिळाला, अनेकांनी प्रवाशाचा उत्साह आणि एअरलाइनच्या सहकार्याच्या वृत्तीचे कौतुक केले. विशेष म्हणजे, एतिहाद एअरवेजच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटनेही या पोस्टला प्रतिसाद देत म्हटले, “तुमच्या सुंदर प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. पुढील प्रवासासाठी शुभेच्छा!”

या क्लिपला अनेकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. बहुतांशी लोकांनी हा क्षण चांगला आणि उत्साहवर्धक असल्याचे म्हटले आहे. एका वापरकर्त्याने लिहिले, हे खूप हृदयस्पर्शी आहे, तर दुसऱ्याने टिप्पणी केली, व्वा, हे खूप गोंडस आहे. इतरांनी एअरलाइन कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या दयाळूपणाचे कौतुक केले आहे.