सैराट होऊ नका, घरातच थांबा!

1753

>> आकाश ठोसर, अभिनेता

सध्या मी पुण्यातील घरी कुटुंबासोबत मजेत वेळ घालवतोय. काहीजण आता म्हणतायत की लॉकडाऊनमुळे आम्हाला घरी कंटाळा आलाय, आम्ही दिवसभर झोपून असतो, आता आम्हाला काहीच काम नाहीये…पण माझी ह्यातली कोणतीच तक्रार माझी नाहीये. कारण मला मिळालेल्या वेळेचा मी सदुपयोग करतोय.

सकाळी 6 वाजता उठून ट्रेडमिलवर किमान 6 ते 7 किमी धावणे, दिवसातले किमान 2 तास वाचन करणे, एक तरी चांगला सिनेमा बघणे आणि संध्याकाळी 7.30 पूर्वीच जेवण करणे अशा चांगल्या सवयी या सुट्टीत मी स्वतःला लावल्या आहेत. या गोष्टी मला बऱ्याच दिवसांपासून करायच्या होत्या पण सतत कामात व्यस्त असल्याने त्या मागे राहिल्या होत्या. ‘सैराट’नंतर गेल्या चार वर्षात मी खूप व्यस्त झालो. आता घरातल्यांना मनसोक्त वेळ देता येतोय. आईला देखील आनंद झालाय. ‘तुझ्यासाठी आवडीचे काय बनवू,’ असे ती सारख विचारते. पण मी डाएट करत असल्याने रोज वरण, भात, भाकरी असे साधे जेवण जेवतो. 15 दिवसांतून एकदा ‘चीट डे’ म्हणून मी माझ्या आवडीचे आलू पराठे, बिर्याणी, मटण भाकरी खातो. मी तालमीत होतो त्यामुळे मला आधीपासूनच जेवण बनवता येते. या सुट्टीत मी आणखी चांगल्याप्रकारे जेवण बनवायला शिकलोय. नुकताच मी केक बनवला होता.

लॉकडाऊन संपून शूटिंग कधी सुरू होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे स्वतःला शक्य तितकं फिट ठेवण्याचा माझा प्रयत्न करतोय. मागच्याच महिन्यात माझ्या एका सिनेमाचे शुटींग सुरू होणार होते. पण लॉकडाऊनमुळे ते पुढे ढकलले आहे. हा सिनेमा माझ्या ड्रीम प्रोजेक्टपैकी एक आहे. मी इतके दिवस थांबलोय म्हणजे नक्कीच त्यात काही तरी स्पेशल आहे इतकेच आता मी सांगू शकतो. याशिवाय काही स्क्रिप्टचे वाचन आणि फोनवर मीटिंग सुरू आहेत.

शेवटी एवढच म्हणेन की, सध्याच्या कठीण परिस्थितीत डॉक्टर, पोलीस, आरोग्यसेवक आपला जीव धोक्यात घालून आणि स्वतःच्या कुटुंबियांपासून लांब राहून आपली सेवा करतायत. प्रशासनापासून सेलिब्रिटीपर्यंत सगळ्यांनी आवाहन करूनही काही लोक रस्त्यांवर विनाकारण भटकतायत. हे पाहून संताप येतो. आता लॉकडाऊन असून देखील कोरोनाचे इतके प्रमाण वाढतेय. उद्या लॉकडाऊन हटवले तर किती गंभीर अवस्था होईल? याचा विचार करा. आपण
प्रशासनाचे जितके ऐकू तितक्या लवकर आपण लॉकडाऊनमधून बाहेर पडू. त्यामुळे सध्यातरी घरातच राहा, सुरक्षित राहा!!!

महापुरुषांपासून प्रेरणा मिळतेय!

सध्या मी शिवाजी सावंत यांची संभाजी महाराज यांच्यावरील ‘छावा’ ही कादंबरी वाचतोय. ही कादंबरी वाचताना खूप मजा येतेय. त्यातील एखाद्या प्रसंगाबद्दल आणखी माहिती मी युट्यूब, गुगलवर सर्च करतो. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जिजाऊ यांच्यावरील पुस्तके देखील वाचली. येणाऱ्या संकटाला सामोरे जाण्यासाठी हे महापुरुषच मला प्रेरणा देतायत. तुम्ही देखील महापुरुषांवरील पुस्तके वाचा, स्वतःला चांगल्या सवयी लावा, आरोग्याकडे लक्ष द्या असे माझे आवाहन आहे.

आपली प्रतिक्रिया द्या