अंधेरीच्या आगीतून पालिकेच्या जिगरबाज अग्निशमन दलाने 33 जणांना वाचवले!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने आज पुन्हा एकदा जिगरबाज कामगिरी करताना अंधेरी येथे इमारतीला लागलेल्या आगीच्या जबड्यातून तब्बल 33 रहिवाशांना  सुखरूप बाहेर काढले. यामुळे मोठी दुर्घटना टळली. अग्निशमन दलाच्या या कामगिरीबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

अंधेरी पूर्व साकीनाका, ‘90 फिट’ रोड येथील ‘साथी’ इमारतीला सकाळी 09.48 वाजता आग लागल्याची घटना घडली. ग्राऊंड प्लस पाच मजली ही इमारत आहे. या इमारतीच्या ग्राऊंड आणि पहिल्या मजल्यावर आगीची ठिणगी पडली. या ठिकाणचे फर्निचर, वायरिंग आणि इलेक्ट्रिक सामान अडगळीमुळे मोठ्या प्रमाणात आग भडकली. आगीचे आणि धुराचे प्रचंड लोळ वरच्या सर्व मजल्यांवर पोहोचू लागल्याने रहिवाशांच्या त्रास सुरू झाला. यावेळी अग्निशमन दलाने दहा ते बारा मिनिटांतच घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. ही आग लेव्हल – 1ची असल्याचे तातडीने जाहीर करण्यात आले. यावेळी अग्निशमन दलाने शिडीच्या साहाय्याने 33 जणांना सुरक्षितरीत्या बाहेर काढले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. सुमारे पावणे अकरा वाजताच्या सुमारास आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आल्याची माहिती प्रमुख अग्निशमन दल अधिकारी रवींद्र आंबुलगेकर यांनी दिली. ही आग इलेक्ट्रिक मीटरमध्ये शॉर्टसर्किट होऊन लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून अधिक तपास अग्निशमन दल आणि पोलिसांकडून सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

असे अडकले रहिवासी
आग लागल्याच्या प्रसंगी पहिल्या मजल्यावर चार महिला, तीन पुरुष पहिल्या मजल्यावर अडकले होते. तर दुसर्‍या मजल्यावर पाच महिला, सात पुरुष, दोन मुली आणि दोन नवजात बालके अडकली होती. तर तिसर्‍या आणि चौथ्या मजल्यावर दोन महिला, सहा पुरुष आणि दोन मुले अडकले होते. या सर्वांची खिडकीचे ग्रील कापून शिडीच्या सहाय्याने बाहेर काढत सुखरूप सुटका करण्यात अग्निशमन दलाला यश आहे. या इमारतीत एकूण 100 रहिवासी होते. दरम्यान, सुमारे 30 वर्षे जुनी असलेल्या या इमारतीत अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित नसल्याचे समजते. त्यामुळे संबंधित इमारत व्यवस्थापना तातडीने या ठिकाणी अग्निमशन यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सूचना अग्निशमन दलाकडून देण्यात आल्या आहेत.