आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून आंद्रे रसलची निवृत्ती

वेस्ट इंडीजचा स्फोटक अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसलने आज आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यानंतर निवृत्त होणार आहे. हा दुसरा सामना रसलच्या घरच्या मैदानावर खेळला जाणार असून त्याने आपल्या घरच्या प्रेक्षकांसमोरच अखेरचा सामना खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अनेक अविस्मरणीय कामगिरी आणि सामना फिरवणाऱ्या खेळींसह वेस्ट इंडीजसाठी रसलने गेल्या दशकभरात टी-20 क्रिकेटमध्ये आपली वेगळी छाप उमटवली होती. येत्या 21 जुलैपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका सुरू होणार आहे.

रसलने आपल्या निवृत्तीबाबत एक भावनिक पोस्ट केली, ‘वेस्ट इंडीजसाठी खेळणे ही माझ्यासाठी सन्मानाची बाब होती. मी माझ्या देशासाठी खेळलो, विजयासाठी लढलो आणि लाखो चाहत्यांच्या आवाजात खेळण्याचा सन्मान मिळवला. आता पुढच्या पिढीला चमकण्यासाठी मला जागा द्यायची वेळ आली आहे.’

रसलने 2010 मध्ये टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करत आतापर्यंत 74 टी-20 सामने खेळला आहे. त्याने एक हजारपेक्षा अधिक धावा केल्या असून 61 विकेट्सही टिपल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट आणि सामन्यांवर परिणाम करणारी त्याची शैली ही जगभरातील टी-20 लीगसाठी आकर्षणाचा पेंद्र ठरली.

2016 सालच्या टी-20 विश्वचषकात त्याच्या स्पह्टक फलंदाजीने आणि निर्णायक षटकात घेतलेल्या विकेट्समुळे वेस्ट इंडीजला दुसऱयांदा जगज्जेतेपद भूषवता आले होते. 2012 सालच्या जगज्जेतेपदातही त्याचा मोलाचा वाटा होता. निवृत्तीनंतरही रसल आता फ्रेंचायझी लीगमध्ये आपली फलंदाजी दाखवत राहणार आहे.