
वेस्ट इंडिजचा स्टार अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल (वय – 37) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध घरच्या मैदानावर होणाऱ्या आगामी टी20 मालिकेतील सुरुवातीचे दोन सामने खेळून आंद्रे रसेल आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करेल. वेस्ट इंडिज क्रिकेटने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.
आंद्रे रसेल याने 2010 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून त्याने विंडीजकडून 1 कसोटी, 56 वन डे आणि 84 टी20 सामने खेळले. 2019 पासून तर तो फक्त टी20 सामनेच खेळत आहे. विंडीजकडून त्याने 84 टी20 लढतीत 1078 धावा केल्या असून 61 विकेट्सही घेतल्या आहेत. रसेल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असला तरी आयपीएल आणि जगभरातील टी20 लीग खेळत राहणार आहे.
View this post on Instagram
आंद्रे रसेल याने एक निवेदन जारी करत आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. वेस्ट इंडीज क्रिकेटचे प्रतिनिधित्व करणे ही माझ्या आयुष्यातील सर्वात अभिमानास्पद गोष्ट आहे. मी लहान असताना मला या टप्प्यावर पोहोचण्याची अपेक्षा नव्हती. परंतु जेव्हा मी खेळायला सुरुवात केली तेव्हा खेळाच्या प्रेमात पडलो आणि ते साध्य करू शकलो. मला मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये छाप सोडायची होती आणि इतरांसाठी प्रेरणआ बनायचे होते, असे रसेल म्हणाला.
मला वेस्ट इंडिजसाठी खेळणे आवडते. तसेच माझ्या घरच्यांसमरो, कुटुंबियांसमोर, मित्रांसमोर खेळणे आवडते. त्यांच्यासमोर माझी प्रतिभा दाखवण्याची आणि चांगली कामगिरी करण्याची संधी मिळते. मी माझ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा शेवट शानदार पद्धतीने करायचा आहे. सोबतच कॅरेबियन क्रिकेटपटूंच्या पुढच्या पिढीसाठी आदर्श बनायचे आहे, असेही रसेल म्हणाला.