वेधक – भूलतज्ञ, वैद्यकशास्त्रातील महत्त्वाची शाखा

>> डॉ. शिल्पा तिवसकर

भूलतज्ञ म्हटले की, त्यांच्याबद्दल अजिबात माहिती नसणे किंवा चुकीची माहिती असणे इतपतच असते. परंतु त्यापलीकडे वैद्यकशास्त्रात त्यांचे महत्त्व वेगळे आहे. याविषयी…

महाराष्ट्र भूल संघटनेची कॉन्फरन्स जवळ आली होती. काही निमित्ताने मी खरेदीला गेले होते. पोत्याशी संवाद साधता त्याने विचारले, कसले डॉक्टर आहात? मी भूलतज्ञ आहे म्हणताच, `अच्छा सर्वांना झोपी घालता तुम्ही!’ अशी कोटी केली त्याने. मी काहीशी चकीत होत चाचपलेही. मनात आले, `अरेच्चा! हे काय? आमचा पूर्ण अभ्यास, पूर्ण परिश्रम याची व्याख्या फक्त या एवढय़ाच शब्दांत यावी का?’

विक्रेत्याच्या या विधानाने माझ्यातला भूलतज्ञ जागा झाला.  मी आजुबाजूला कटाक्ष टाकत तिथे खरेदीला आलेल्या काहीजणांना एकत्र बोलावले. या सगळ्यांशी यासंदर्भात संवाद साधायलाच हवा असा काहीसा चंग बांधत मी त्यांना विचारले, `मला सांगा… तुमच्यापैकी कोणाला भूलतज्ञाबद्दल माहिती आहे का? अॅनेस्थिशियॉलॉजिस्टबद्दल तुम्हाला कितपत माहिती आहे?’

माझ्या प्रश्नाने जमलेले सारे काही क्षण गोंधळले. पण त्यापैकी काहींनी पुढे येत सांगण्याचा प्रयत्न केला. एक गृहस्थ पुढे आले आणि म्हणाले, `हो, भूलतज्ञ सीपीआर देऊन प्राण वाचवतात. आमच्या बिल्डिंगमध्ये एक काका अचानक बेशुद्ध झाले होते. आम्ही स्थानिक भूलतज्ञांना बोलावले. त्यांच्याकडून सीपीआर देत देतच काकांना हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केले.’  तिथे छोटं बाळ घेतलेली महिला होती. तिने सांगितले, `हो, प्रसूतीच्या वेळेस मला खूप वेदना होत होत्या. त्यावेळेस भूलतज्ञानेच मला लेबर अॅनेस्थेशिया दिला आणि माझी प्रसूती नीट पार पडली.’ एक आजीबाई काठी सांभाळत म्हणाल्या, `हाऊ कॅन आय फरगेट हर? माझ्या एन्जोप्लास्टीच्या वेळेला अख्खा वेळ माझा हात पकडून मला आश्वासन देणारी माझी भूलतज्ञच तर होती. तिने मला पेन रिलीफचे औषध दिले. ऑक्सिजन लावला आणि सांगितलं, आजी काळजी करू नका. मी आहे तुमच्याबरोबर.’

 जमलेल्या लोकांपैकी एक जण म्हणाले, `मी एक इन्स्पेक्टर आहे. माझ्या वडिलांचं हृदय कमकुवत आहे. त्यांच्या छातीत पाणी भरले आणि त्यांना श्वास घ्यायला खूप त्रास होऊ लागला. ते अगदी काळेनिळे पडले होते. त्यांना जेव्हा हॉस्पिटलच्या इमर्जन्सी रूममध्ये घेऊन गेलो तेव्हा लगेच एक डॉक्टर आले. त्यांनी श्वासनलिका टाकली. औषधे देऊन तिकडेच माझ्या वडिलांचे प्राण वाचवले. ते भूलतज्ञ होते आणि त्यांनी इमर्जन्सी मेडिसिन देऊन हृदयावरचा आणि फुप्फुसांवरचा दाब कमी केला.’

मी म्हणाले, `तुम्हा सर्वांच्या प्रतिसादाने  मी भारावून गेले आहे. वळून त्या पोत्याला म्हणाले, `बघ रे बाबा, नुसतं काही भूलतज्ञ झोपवत नाही. तो कार्डियाक कॅथलॅबमध्ये काम करतो एन्जोप्लास्टीच्या वेळेला, तो लेबर एनलजेसिया देऊन प्रसूतीचे दुखणं कमी करतो, तो आयसीयूमध्ये काम करतो आणि इमर्जन्सीमध्येसुद्धा काम करून श्वासनलिका टाकून जीव वाचवतो. एमआरआय आणि सिटीस्कॅनच्या वेळी मदत करतो.’

तशी एक महिला म्हणाली, `हो हो! सिटीस्कॅनच्या वेळेला लिव्हर बायोप्सीच्या वेळेला भूलतज्ञांनी मला खूप मदत केली.’  वातावरण टाळ्यांच्या जल्लोषांनी भरून गेले. या सगळ्यांना मला दोन महत्त्वाच्या गोष्टी सांगणे भाग होते. मी म्हणाले, `जायच्या आधी फक्त पाच मिनिटे द्या. मला सांगा भूलतज्ञ किती शिकला असतो असं तुम्हाला वाटते.’

पाच वर्षे एमबीबीएस, एक वर्ष इंटर्नशिप आणि तीन वर्षे एमडी अॅनेस्थेशिया. नऊ वर्षे शिक्षण घेतलेलं असतं. म्हणजे तुमचा फॅमिली फिजिशियन जो एमबीबीएस असतो, त्याच्यापेक्षाही अजून तीन वर्षे स्पेशलायजेशन इन अॅनेस्थेशिया असं भूलतज्ञाने केलेले असते. बरं, आता तुमचा ऑर्थोपेडिक किंवा हाडाचा जो सर्जन आहे तो हाडाची सर्जरी करतो, कानाचा सर्जन आहे तो कानाची करतो, पण आम्हाला भूलतज्ञाला प्रत्येक सर्जरीला अनुकूल अशी भूल देणे भाग आहे. त्यामुळे आम्ही एमडीची तीन वर्षे प्रत्येक ऑपरेशन थिएटरमध्ये आम्हाला फिरवतात… मग ते मेंदूचे, हृदयाचे, हाडाचे ऑपरेशन किंवा किडनीचे ट्रान्सप्लांट असेल. भूलतज्ञाला सगळ्याची माहिती असणे गरजेचे आहे. भूलतज्ञ हा मोजून मापूनच औषध देतो. प्रत्येकाच्या वयानुसार, वजनानुसार शरीरयष्टीप्रमाणे, ब्लडप्रेशर, डायबेटीस, थायरॉईड, किडनी, अस्थमा किंवा अजून काही अॅलर्जी असेल त्याप्रमाणेच औषध देतो. ही औषधे देण्याची क्रिया पण टप्प्याटप्प्याने असते. थोडं औषध देऊन पेशंटचा रिस्पॉन्स बघून अजून औषध असे देताना एखाद्याचे शरीर कसं रिस्पॉन्ड करेल हे त्याच्या हातात नसते. याबाबत कोणतीही खात्री नसते. त्यमुळे प्रत्येक कॉम्प्लिकेशन हे अॅनेस्थेशियामुळे, भूलतज्ञामुळे झाले असेल असे बिलकूल गृहीत धरू नका ही माझी कळकळीची विनंती आहे. कोणीही डॉक्टर पेशंटला दुखवण्याकरता त्यांना अॅनेस्थेशिया देत नाही.’