वाढवण बंदराविरोधात संतापाचा भडका; केंद्र सरकारचा पुतळा जाळला

वाढवण बंदराला पालघरमधून विरोध तीव्र होत आहे. वाढवण बंदर अरबी समुद्रात बुडवणारच, असा निर्धार पालघरवासियांनी केला आहे. त्यासाठी तीव्र आंदोलन करण्यात येत आहे. पालघर शुक्रवारी रेल रोको, रस्ता रोको,जलसमाधी आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच स्थानिकांनी केंद्र सरकारता पुतळा जाळून आपला निषेध व्यक्त केला आहे. तसेच भूमीपुत्रांच्या विरोधात असणारे हे बंदर अरबी समुद्रात बुडवण्याचा निर्धारही करण्यात आला आहे.

केंद्रात सत्तेवर येताच मोदी सरकारने आमचा घात केला आहे. जुलूम जबरदस्तीने वाढवण बंदर आमच्या माथ्यावर लादून आम्हाला उद्ध्वस्त करण्याचा घाट घातला आहे. कितीही मंजुऱ्या द्या, कारस्थाने करा, मोदींच्या एनडीए सरकारची दडपशाही झुगारून वाढवण बंदर अरबी समुद्रात बुडवणारच, असा एल्गार वाढवणवासीयांनी केला आहे. त्यासाठी शुक्रवारी केंद्र सरकराचा पुतळा जाळून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.

पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराच्या मासेमारीवर भूमिपुत्र आणि मच्छीमारांचे पोट अवलंबून आहे. परंतु वाढवण बंदर लादून या मच्छीमार आणि भूमिपुत्रांना विस्थापित करण्याचा आणि त्यांच्या रोजीरोटीवर नांगर फिरवण्याचा घाट केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने घातला आहे. वाढवण बंदराची वीटही रचू देणार नाही, एकच जिद्द वाढवण बंदर रद्द, असा नारा देत या बंदराविरोधात अनेक आंदोलने करण्यात आली.