भाविकांच्या स्वागतासाठी आंगणेवाडी सज्ज

417

अमित खोत

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील भराडी देवीचा यात्रोत्सव उद्या सोमवार पासून सुरू होत असून, भाविकांच्या स्वागतासाठी आंगणेवाडी सज्ज झाली आहे. पहाटे 3 वाजल्यापासून देवीच्या दर्शनास सुरुवात होत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या लाखो भाविकांना सुलभ दर्शन व्हावे यासाठी उड्डाण पुलासह 9 रांगांतून भाविकांना सुलभ व जलद दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सोमवारी दुपारी भराडी देवीचे दर्शन घेणार आहेत.

कणकवली, मालवण या दोन्ही बाजूने विविध रांगांतून भाविकांना अवघ्या काही मिनिटांतच दर्शन मिळेल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. सिद्धिविनायक मंदिर धर्तीवर देवीच्या मुखदर्शनासाठी विशेष मार्ग व्यवस्था करण्यात आली आहे. व्हीआयपी, मंत्री यांच्यासह आपत्कालीन व्यवस्था व अपंग, ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र रांग व मार्ग असणार आहे. त्यांना कणकवली व मालवण या वाहनतळ ठिकाणाहून रिक्षाने मंदिरापर्यंत आणले जाणार आहे.

पहाटे ३ वाजल्यापासून देवीच्या दर्शनाची व ओटी भरणा कार्यक्रमास सुरवात होणार आहे. जादा रांगांमुळे भाविकांना दर्शन अवघ्या 15 ते 20 मिनिटांत मिळेल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. आंगणेवाडी उत्सवात भाविकांसह मोठी राजकीय गर्दी उसळणार आहे. व्हीआयपींची संख्याही वाढेल, असा अंदाज वर्तवत भाविक व नेते मंडळीं यांच्यासह यात्रा सुरक्षेसाठी 200 पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी 52 अधिकारी, सीआरपी पथके अधिकाऱ्यांसह तैनात ठेवली गेली आहेत. मंत्री व अन्य व्हीआयपी यांना स्वतंत्र दर्शन मार्ग आहे, तर हेलीपॅड तयार ठेवण्यात आली आहेत. बच्चे कंपनीचे आकर्षण खेळणी, यात्रेत स्पेशल असणारा मालवणी खाजा, दुकाने व हॉटेल गजबजली आहेत. दुकाने सजली असून चाकरमानी व ग्रामस्थांच्या उपस्थितीने यात्रेच्या पूर्वसंध्येला यात्रा परिसर फुलून गेला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या