
लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या मालवण तालुक्यातील मसुरे येथील आंगणेवाडी यात्रोत्सवाची उत्पंठा शिगेला पोहोचली आहे. शनिवारी मतदानासाठी आलेल्या चाकरमान्यांसह देशाच्या कानाकोपऱयातील पर्यटकांनी रविवारी सिंधुदुर्गातील पर्यटन करून देवदर्शनाची वाट धरली. मात्र मुंबई-गोवा महामार्गावरील कसालवरून जाणाऱया सुकळवाड, कट्टा, चौके बाजारपेठेत सकाळच्या वेळेत वाहनांच्या काही काळ रांगा लागल्या होत्या. परंतु उत्सवाची ओढ लागलेल्या सर्वांकडून भराडी देवीचा जयघोष सुरू होता.
कोकण रेल्वे प्रवास करायचा म्हटला तर नेहमीच मिळणारी वेटिंग लिस्ट पाहता पर्यटकांसह चाकरमान्यांनी यंदा कुटुंबकबिल्यासह भराडी देवीच्या यात्रोत्सवास येण्यासाठी खासगी वाहनांचा पर्याय निवडला. शुक्रवारी मतदान करताना पर्यटन फिरून आंगणेवाडीची वाट धरली. परंतु अनेकांच्या गाडय़ा वाहतूककाsंडीत अडकल्या. कसाल, सुकळवाड, कट्टा, चौके बाजारपेठेत गाडय़ा कासवगतीने पुढे सरकत होत्या. रविवारी रात्री तर वाहनांची संख्या यापेक्षा वाढण्याची शक्यता आहे.
यात्रोत्सवाकडे जाणाऱ्या अन्य मार्गांवरही गर्दी होणार
आंगणेवाडी यात्रोत्सवाकडे जाणारे इतर गावागावातील मार्गही गजबजलेले असणार आहेत. कसाल-हेदुळ, खोटले, वायंगवडे, मसदे बागायत मार्गे आंगणेवाडी, हिवाळे, राठिवडे, विरण, बागायत, आंगणेवाडी याशिवाय सुकळवाड-कट्टा, गुरामवाड, बेळणे, बागायत आंगणेवाडी, कुणकवळे मार्गे माळगाव, बागायत आंगणेवाडी असे ग्रामीण मार्गही वाहनांच्या गर्दीने फुलून जाणार आहेत. देवगडवासीयांसाठी शिरगाव, पुळे, सांडवे, रामगड, बेळणे हा जवळचा मार्ग असून भाविक याच मार्गाचा वापर करत आहेत.



























































