फ्लायओव्हरवर तरुण करायचे स्टंट, रहिवाशांनी फ्लायओव्हरवरून फेकली स्कूटी

हायवेवर स्टंट करणे काही तरुणांना महागात पडलं आहे. कारण काही नागरिकांनी मिळून या स्टंट करणाऱ्यांची स्कूटी फ्लायओव्हरवरून खाली फेकली आहे. काही तरुण या मार्गावर नेहमी स्टंट करत होते. या गोष्टीला कंटाळून या नागरिकांनी ही स्कूटर फेकली आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार बंगरुळूच्या तुमाकुरू हायववेवर अनेक तरुण आपल्या स्कूटीवर जीवघेणे स्टंट करायचे. त्याचे अनेक व्हिडीओही व्हायरल झाले होते. गुरुवारी दोन स्कूटरवर काही तरुण असेच स्टंट करत होते. तेव्हा एक अपघात झाला. या अपघातानंतर तिथे राहणारे काही रहिवासी एकत्र आले आणि त्यांनी या स्कूटर ताब्यात घेतल्या. त्यानंतर ही स्कूटर फ्लायओव्हरवरून 30 फूट खाली फेकली.

 

त्यानंतर पोलिस घटनास्थळी आले तेव्हा स्टंट करणाऱ्या तरुणांनी जागेवरून पळ काढला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी आठ तरुण चार बाईक्सवर स्टंट करत होते. त्यांचा छोटा अपघात झाल्यानंतर काही नागरिकांनी त्यांची एक स्कूटी फ्लायओव्हरवरून फेकून दिली.

इलेक्ट्रॉनिक सिटी फ्लायओव्हर, आंतरराष्ट्रीय विमानतळ मार्ग आणि नीलमंगला मार्गावर हे तरुण नेहमी स्टंट करत असात असे पोलिसांनी सांगितले. इथे पोलिसांची गस्त असते, पण अनेकजण बाईकवरची नंबरप्लेट काढून इथे स्ंटट करताना दिसतात.

गेल्या काही वर्षांत असे स्टंट केल्यामुळे अनेक अपघात आणि मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे या भागात सीसीटीव्ही लावून स्टंट करणाऱ्या तरुणांना अटक करण्यात आली होती. या वर्षात आतापर्यंत 74 जणांवर कारवाई केली असून त्यांच्याकडून पाच लाख रुपयांचा दंड वसू करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.