कामे मुदतीत पूर्ण नाही मात्र टोलवसुलीचा पैसा म्युच्युअल फंडात गुंतवला, अनिल अंबानींच्या कंपनीवर गंभीर आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अनिल अंबानी यांच्या मालकीची कंपनी असलेल्या R-Infra या कंपनीच्या मालकीती P S Toll ही कंपनी आहे. या कंपनीकडे पुणे-बंगळुरू महामार्गाच्या महत्वाच्या टप्प्याच्या विस्तारीकरणाचे काम आहे. हे काम अनेक मुदती उलटून गेल्यानंतरही पूर्ण करण्यात आलेले नाहीये. असं असलं तरी या कंपनीवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मेहेरबान झाले असल्याचा आरोप करण्यात येत असून प्राधिकरणाने या कंपनीला नव्याने 260 कोटींचे कर्ज देण्याबाबत विचार सुरू केला आहे.

कर्ज देण्याबाबतचा विचार गेल्या वर्षी केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत झाला होता आणि त्याबाबतचा प्रस्ताव दिल्ली दरबारी दाखल करण्यात आला आहे असे वृत्त मुंबई मिरर या इंग्रजी वर्तमानपत्राने दिले आहे. अनिल अंबानी यांच्या मालकीच्या आर-इन्फ्रा कंपनीकडे मुंबईतील घाटकोपर-अंधेरी मेट्रोचे संचालन आहे. याच कंपनीची उपकंपनी असलेल्या पी.एस.टोल या कंपनीला पुणे-बंगळुरू महामार्गावरील 140 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सोपवण्यात आले होते. 2010 साली हे काम या कंपनीला देण्यात आले होते. 10 वर्ष होत आली तरी हे काम पूर्ण झालेले नाहीये. या कामासाठी सुरुवातीला 30 महिन्यांची मुदत देण्यात आली होती जी नंतर 12 महिन्यांनी वाढवण्यात आली होती.

पी.एस.टोल कंपनीसोबतच्या कंत्राटामध्ये म्हटले आहे की जर मुदतीमध्ये पहिले दोन टप्पे पूर्ण करण्यात अपयश आलं तर कंपनीला तिसरा टप्पा स्वत:च्या खर्चाने पूर्ण करावा लागेल. हा टप्पा पूर्ण झाल्यानंतरच ही कंपनी एस्क्रो खात्यातील म्हणजेच त्रयस्थाकडे ठेवलेल्या निधीतून पैसा काढू शकेल. मात्र मुदतीनंतर मुदती उलटून गेल्या तरी प्राधिकरणाने या कंपनीसोबतच्या कराराच्या अधीन राहून हालचाली केल्या नाही असं या इंग्रजी वर्तमानपत्राने दिलेल्या बातमीत म्हटले आहे. या करारामध्ये मुदतीत काम पूर्ण न झाल्यास सुरक्षा ठेवीच्या 0.1 टक्के आणि जास्तीत जास्त 20 टक्के रक्कम दर दिवसाला कंपनीकडून वसूल करण्यात यावी असं म्हटलं होतं. याही गोष्टींचं प्राधिकरणाने पालन केलेलं नाही आणि कंपनीकडून दंड वसूल केलेला नाही असं या बातमीत म्हटलं आहे.

पी.एस टोल या कंपनीने मुदतीत काम पूर्ण केले नाहीच शिवाय ऑक्टोबर 2010 पासून पुढची दोन वर्ष टोलमधून मिळालेला पैसा म्युच्युअल फंडात गुंतवला. ही रक्कम 225 कोटी इतकी असल्याचं सांगितलं जात आहे. करारानुसार हा पैसा एस्क्रो निधीमध्ये जमा केलं जाणं गरजेचं होतं. ही रक्कम फक्त प्रकल्पापुरताच वापरणं बंधनकारक होतं. याबाबत कॅगने ताशेरे ओढल्यानंतर ही रक्कम एस्क्रो निधीत वळती करण्यात आली. असं असतानाही या कंपनीला प्रकल्प पूर्तीसाठी नव्याने कर्ज देण्याबाबत विचार केला जात आहे.

सदर वृत्त देणाऱ्या वर्तमानमानपत्राने आर-इन्फ्रा कंपनीचीही बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ईमेलद्वारे झालेल्या संभाषणादरम्यान कंपनीच्या प्रवक्त्याने नवं कर्ज मिळणं यात काहीच चुकीचं नसल्याचं म्हटलं आहे. प्रकल्प हा प्राधिकरणाच्या नियमानुसारच पूर्ण केला जात असून प्रकल्पाला झालेला उशीर हा अनियंत्रित कारणांमुळे झालेला आहे. आम्ही हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी कटीबद्ध आहोत असेही प्रवक्त्याने म्हटले आहे.