
जोपर्यंत धारावीवासीयांना त्यांच्या हक्काचे सर्व काही मिळत नाही तोपर्यंत अदानी कंपनीचा एकही महाल धारावीत उभा राहू देणार नाही, एकही वीट रचू देणार नाही, असा कडक इशारा शिवसेना नेते खासदार अनिल देसाई यांनी दिला.
माहीम रेल्वे स्थानक पूर्वेस माहीम फाटक येथे धारावी बिजनेसमेन्स वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने विशाल जनसभा आयोजित केली होती, त्यावेळी अनिल देसाई बोलत होते. धारावीमधील प्रत्येक पात्र-अपात्र झोपडी, दुकाने, गाळे आणि उद्योगांच्या जागा या सर्वांना 500 चौरस फुटांपेक्षा जास्त जागा धारावीतच मिळाली पाहिजे. यासाठी धारावी बचाव आंदोलन ही गेल्या वर्षभरापासून धारावीमध्ये जनजागृती सभा घेत आहे. धारावी बचाव आंदोलनाला धारावी बिजनेसमेन्स वेल्फेअर असोसिएशन या संघटनेचे पाठिंबा दिला आहे. यामुळे धारावी बचाव आंदोलनास मोठे बळ मिळाले आहे.
यावेळी काँग्रेस आमदार ज्योती गायकवाड, धारावी बिजनेसमेन्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष मंगरुरशेठ, माजी अध्यक्ष अन्सारभाई, समितीचे समन्वयक अॅड. राजू कोरडे, स्थानिक रहिवासी तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आम आदमी पक्ष, भाकप, माकप, शेकाप आणि इतर डावे पक्ष यांचे पदाधिकारी उपस्थित होते.
धारावीच्या जमिनीचा ताबा सोडणार नाही
धारावीमधील जमिनीचा सरकारी दर हा एका गुंठय़ास एक कोटी रुपये आहे, तर एका एकराचे 40 कोटी होतात. आणि 540 एकराचे किती होतात याचा हिशेब तुम्ही करा. एवढी महागडी जमीन अदानींना मिळते विकास करण्यासाठी. तरीसुद्धा राज्य सरकार, अदानी कंपनी 500 चौरस फुटांची जागा घर, दुकाने,गाळा यासाठी द्यायला तयार नाही. मात्र, जोपर्यंत आम्हाला 500 चौरस फुटांपेक्षा जास्त जागा प्रत्येकाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही धारावीच्या जमिनीचा ताबा सोडणार नाही, असा इशारा माजी आमदार बाबूराव माने यांनी दिला.
डंपिंग ग्राऊंडवर तुमचे मॉल उभारा!
राज्य सरकार, अदानी कंपनी धारावीवासीयांना डंपिंग ग्राउंडवर उचलून फेपून लावण्यास निघाली आहे. आम्ही का म्हणून देवनार, मुलुंडच्या कचराभूमी-डंपिंग ग्राउंडवर जायचे? आम्ही जाणार नाही या डंपिंग ग्राउंडवर. तुम्ही तुमचे मॉल या कचराभूमीवर उभारा, असे आव्हान मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी अदानी पंपनी आणि राज्य सरकारला दिले.