ज्येष्ठ नागरिकाचे प्राण वाचविणारे कॉन्स्टेबल, सुजितकुमार यांचा गृहमंत्री देशमुख यांच्या हस्ते सत्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रेल्वे पोलीस दलातील पोलीस कॉन्स्टेबल सुजीतकुमार निकम यांनी स्वतःचे प्राण धोक्यात घालून दहिसर रेल्वे स्थानकावर एका 60 वर्षीय व्यक्तीचे प्राण वाचवले त्याबद्दल त्यांचा गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते आज सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना पोलीस दलाकडून जेव्हा मानवतावादी कामगिरी त्यांच्या हातून घडते त्यावेळेस पोलिसांच्या कामगिरीचा मला प्रचंड अभिमान वाटतो, असे गौरवोद्गार गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काढले.

‘ज्ञानेश्वरी’ या शासकीय निवासस्थानी पार पडलेल्या या सत्कार सोहळ्यात बोलताना गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले, ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रीदवाक्याला अनुसरून पोलीस बांधव आपले कर्तव्य बजावत असतात. पोलीस दलातील शिपाईपासून ते वरिष्ठ अधिकाऱयांपर्यंत उत्तम काम करणाऱयां तसेच समाजाप्रति आपला वेगळा ठसा उमटवतात. गृहमंत्री या नात्याने पोलीस बांधवांचे मनोबल वाढवणे, त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस करणे, त्यांच्या सुख दुःखाची दखल घेणे हे आपले कर्तव्य व आपली ती नैतिक जबाबदारी असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

दहिसर स्थानकात असे वाचवले प्राण

1 जानेवारी रोजी गणपत सोलंकी हे 60 वर्षांचे गृहस्थ दहिसर येथून खारला जाण्यासाठी प्लॅटफॉर्मवर उभे होते. त्यावेळी दोन नंबर प्लॅटफॉर्मवरून स्लो लोकल जाणार होती. ती पकडण्यासाठी फ्लाय ओव्हर ब्रिजचा वापर न करता रुळावर उडी मारून धावत दुसऱया बाजूस असलेली लोकल पकडण्याचा त्यांचा विचार होता. त्यानुसार त्यांनी रुळावर उडी मारली, परंतु विरुद्ध दिशेने येणारी फास्ट लोकल पाहता ते गांगरून गेले त्यांना परत फलाटावर चढता येत नव्हते. हे दृश्य तिथे कर्तव्यावर असलेले पोलीस शिपाई सुजीत कुमार यांनी पाहिले. परिस्थितीचा अंदाज घेऊन त्यांनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता गणपत सोलंकी यांना फलाटावर ओढून घेतले व त्यांचा जीव वाचवला. त्यानंतर त्यांच्या मुलाला बोलावून त्यांना त्यांच्याकडे सुपूर्द केले. या कामगिरीबद्दल निकम यांचा सत्कार आज गृहमंत्र्यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन केला. यावेळी रेल्वे पोलीस उपायुक्त प्रदीप चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर पवार उपस्थित होते.

आणखी एका पोलिसाने वाचवले प्रवाशाचे प्राण

धावती लोकल पकडताना तोल जाऊन फलाटाच्या गॅपमध्ये जाणाऱया प्रवाशाचे प्राण दहिसर रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई योगेश हिरेमठ यांनी वाचवले. हिरेमठ यांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

नुकतेच बोरिकली रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई एस. निकम याने दहिसर रेल्वे स्थानकात एका प्रवाशाचे प्राण वाचवले होते. ही घटना ताजी असतानाच दहिसर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई योगेश हिरेमठ यानेदेखील एका प्रवाशाचे प्राण वाचवले आहे. हिरेमठ हे शुक्रवारी दुपारी दहिसर रेल्वे स्थानक फलाट क्रमांक 1 येथून जात होते. तेव्हा लोकल विरारच्या दिशेने जात असतानाच एक 55 वर्षीय प्रवासी हा धावती लोकल पकडत होता. त्या प्रवाशाचा तोल जाऊन तो फलाटाच्या गॅपमध्ये जाणार होता. हा प्रकार हिरेमठ याच्या लक्षात आला. हिरेमठ यांनी त्या प्रवाशाला बाहेर खेचले.