लेख : ओझे अभ्यासक्रमाचे आणि दप्तराचे!

>>डॉ. अनिल कुलकर्णी<<

अभ्यासक्रमाचे आणि दप्तराचे मोठे ओझे सध्या विद्यार्थ्यांच्या खांद्यावर आहे. आजचे अभ्यासक्रम इतके तणावग्रस्त आहेत की, विद्यार्थी वाचतात आणि गोंधळतातभरपूर माहिती, पण शिक्षण नाही अशी त्यांची अवस्था आहे. ‘घोका आणि ओका’, ‘पहा व लिहाच्या नादात मूल्ये, ज्ञान, कौशल्ये यापासून ते मैलोगणती दूर चालले आहेत. एकच अभ्यासक्रम सर्व शाळांत असला तरी समान मूल्ये का झिरपत नाहीत याचाही विचार व्हायला हवा. नवीन अभ्यासक्रम कमी करताना शैक्षणिक संस्थांमध्ये प्रज्ञेबरोबर प्रतिभाही बहरायला हवी.

अनुवंशिकता व कौशल्येच माणसाला तारतात, यशाकडे नेतात. योग्य वेळी सुप्तगुण ओळखण्याची व त्याला वाव देण्याची यंत्रणा अभ्यासक्रमात हवी. आजच्या अभ्यासक्रमातून परीक्षार्थी बाहेर पडत आहेत. अभ्यासक्रमातून विद्यार्थी, माणूस बाहेर पडला पाहिजे. केवळ परीक्षा नव्हे, तर जीवनात यशस्वी होणारी फळी निर्माण व्हायला हवी.

केंद्रीय मनुष्यबळ  विकास मंत्रालयाने नागरिकांकडून सूचना मागविल्या आहेत. ज्यामध्ये एनसीईआरटी अभ्यासक्रमाचा भाग विद्यार्थ्यांवर भार कमी करण्यासाठी केला जाऊ शकतो. अभ्यासक्रमाची संख्या पुढील 2 ते 3 वर्षांत कमी केली जाईल. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या म्हणण्यानुसार “आम्ही एनसीईआरटीला सध्याच्या अभ्यासक्रमाचे मूल्यमापन करण्यास व त्यानुसार काय केले जाऊ शकते आणि काय राखले जाऊ शकते हे ठरविण्यास सांगितले आहे.’’

अभ्यासक्रमाचे आणि दप्तराचे मोठे ओझे सध्या विद्यार्थ्यांच्या खांद्यावर आहे. आजचे अभ्यासक्रम इतके तणावग्रस्त आहेत की, विद्यार्थी वाचतात आणि गोंधळतात.  भरपूर माहिती, पण शिक्षण नाही अशी त्यांची अवस्था आहे. ‘घोका आणि ओका’, ‘पहा व लिहा’च्या नादात मूल्ये, ज्ञान, कौशल्ये यापासून ते मैलोगणती दूर चालले आहेत. विद्यार्थी केवळ शब्दकोष नसावेत, आपल्या रोजच्या जीवनात मूल्य शिक्षण, जीवन कौशल्ये, अनुभवातून शिक्षण आणि शारीरिक तंदुरुस्ती निर्माण करणे ही काळाची गरज आहे. अभ्यासक्रमाचे ओझे कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांना विविध विषयांची मूलभूत तत्त्वे जाणून घेणे, त्यांना संपूर्ण व्यक्तिमत्त्व विकासासाठी कसे अर्थ आणि विश्लेषण करावे हे शिकवणे आवश्यक आहे.

एखादी सहल काढली की शाळा कृतार्थ होतात. आता सहलींवर निर्बंध व अटी आल्या आहेत. आमचे विद्यार्थी समाजात किती मिसळतात, तशा संधी त्यांना शाळा, कुटुंबाकडून मिळतात  का? मूल्ये, संस्कार, संवाद हरवलेल्या कुटुंबात मुले वाढत आहेत. कुटुंबातले संस्कार घराच्या उंबरठय़ाच्या बाहेर तग धरत नाहीत, शाळेतील संस्कार समाजात तग धरेनासे झालेत.

शिक्षकांचेही फार वेगळे नाही. त्यांनाही मुळात वाचनात आवड हवी. गोष्टींचा खजिना त्यांच्याकडे हवा. परिपाठात द्यायला ‘आशय’ समृद्ध हवा. ‘लक्ष्मी’ला वंदन करून आलेले शिक्षक असतील, कॉपी, पैसे याचा आधार घेऊन शिक्षक झाले असतील तर ते कसा न्याय देणार? शाळा, महाविद्यालयात कॉपीच्या शिडीवरून पुढे जाणाऱ्यांचे काय? अभ्यासक्रम कमी केला तरी कॉपी, शिकवणी, पेपरफुटी थांबणार आहेत का? कॉपी पकडली म्हणून आत्महत्या करणारे, शिक्षकांना मारणारे विद्यार्थी व त्यांची फौज तयार आहे.

या पार्श्वभूमीवर काही कुटुंबे, शाळा, शिक्षक, पालक निश्चित आपले काम, कर्तव्य चोख बजावत आहेत, नाही तर शिक्षणाचा डोलारा केव्हाच कोसळाला असता. स्वतःकडे स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाकडे लक्ष द्यायला विद्यार्थ्यांकडे वेळच नाही. उठल्यापासून विविध क्लास, सुट्टीतील शिबिरे, छंद यांचा भडिमार त्यांच्यावर आहे. चरकातून निघालेल्या उसाप्रमाणे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं चिपाड झालंय. हे सर्व टाळण्यासाठी दप्तराचे, अभ्यासक्रमाचे ओझे कमी करण्याचा प्रयत्न आहे, पण परीक्षा न दिलेले, अभ्यासक्रमाकडे दुर्लक्ष केलेले अनेक जण कासवाप्रमाणे पुढे गेले त्याचं काय?

विद्यार्थी आणि शिक्षक दोन्ही शिकण्याचा आनंद गमावून बसले आहेत. सध्या शाळेची समस्या अशी आहे की, “खूप शिकवले जाते, परंतु त्यापैकी केवळ एक समजते किंवा शिकता येते’. माहितीपूरक नव्हे, तर तर्कशुद्ध अभ्यासक्रम बनवणे आवश्यक आहे. शिक्षणाचा मुख्य हेतू चांगला मनुष्य बाहेर आणणे हा आहे. Education is to draw best out of child यासाठी त्याला वेळ व संधी हवी. ज्या विषयावर विद्यार्थ्यांना सक्ती करण्यात आली आहे किंवा भविष्यामध्ये त्याचा काही उपयोग होणार नाही अशा विषयांना बोझ समजले जाते. एन.सी.ई.आर.टी.च्या अभ्यासक्रमाचे विश्लेषण आणि विषयाच्या क्षेत्रातील पाठय़पुस्तके आणि खालील गोष्टींवर लक्ष केलेले वर्ग,

शिकण्याचे निष्कर्ष :

  1. सर्व वर्ग आणि विषयात अभ्यासक्रमाची लिंक.
  2. सामग्रीमध्ये आच्छादित विज्ञान आणि भूगोल, भौतिक शास्त्र आणि रसायन शास्त्र इ. भाषेची सुगमता.
  3. सामग्रीची वयोयोग्यता विविध संदर्भ पाठय़पुस्तकावर भार कमी करण्यासाठी वेब पोर्टलद्वारे शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि इतर हितधारकांकडून सूचना आमंत्रित करणे.
  4. अभ्यासपूर्ण संकल्पना, जीवन कौशल्य आणि मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी मूल्यांचे मॉपिंग करून अनुभवात्मक शिक्षणासाठी विकसित करणे.
  5. विद्यार्थ्यांवरील भार कमी करण्यासाठी शालेय अभ्यासक्रमास ‘तर्कशुद्ध’ विषय मांडण्याचे स्वागत करते.

शैक्षणिक शिक्षण, जीवन कौशल्य, अनुभवात्मक शिक्षण, शारीरिक शिक्षण आणि सर्जन कौशल्यासह शिक्षण आवश्यक आहे. यासाठी अशी प्रणाली विकसित करायची आवश्यकता आहे जिथे विद्यार्थ्यांना या प्रत्येकासाठी वेळ मिळेल आणि ज्या भागात ते सर्वात जास्त पसंत करतात त्या क्षेत्रात प्रगती करू शकतील.

थोडक्यात, व्यावसायिक कौशल्ये व मूल्यसंवर्धन, वैधानिक दृष्टिकोन बाळगणारा, कृतीला प्राधान्य देणारा, यशस्वी जीवन जगण्यासाठीची कौशल्ये देणारा, ताणतणाव कमी करणारा, व्यक्तिमत्त्व घडविणारा, शारीरिक तंदुरुस्ती देणारा ‘आनंददायी’ अभ्यासक्रम, तो ट्रीमदेखील असावा व तर्कसंगतही असावा. जीवन यशस्वी जगण्यासाठीची कौशल्ये, मूल्ये कमी केलेल्या अभ्यासक्रमातून झिरपायला हवीत.

 शिक्षक ठेव ठेवतात व विद्यार्थी ठेव ठेवून घेतो. पाऊलो फ्रिअरीने नाइलाज म्हणूनसुद्धा औपचारिक पद्धती वापरू नये असे सुचविले आहे. पाऊलो फ्रेअरीच्या मते ज्या शिक्षणात शिकणारा स्वतःच परिस्थितीवर प्रभुत्व मिळवू शकतो, काय शिकायचे हे ठरवू शकतो. तेच शिक्षण स्वातंत्र्याकडे नेते. आशय ठरवून शिक्षण देण्याऐवजी शिकणाऱ्यांशी संवाद साधून शिक्षणाचा आशय ठरविला पाहिजे.

एकच अभ्यासक्रम सर्व शाळांत असला तरी समान मूल्ये का झिरपत नाहीत याचाही विचार व्हायला हवा. तसेच शिक्षणप्रणालीत प्रतिभेला महत्त्व कधी देणार? शिक्षणात प्रज्ञा ओळखून तिचा विकास करण्याचे प्रयत्न ज्या प्रमाणात होतात त्या प्रमाणात प्रतिभा ओळखणे व तिचा विकास करणं हे घडत नाही. आज शाळेत प्रतिभेला पोषक असे वातावरण आहे का? गुण व त्याने येणारी प्रतिष्ठा महत्त्वपूर्ण बनली आहे. प्रवेश, प्रशासन व परीक्षा हेच शैक्षणिक संस्थांचे काम झाले आहे. नवीन अभ्यासक्रम कमी करताना शैक्षणिक संस्थांमध्ये प्रज्ञेबरोबर प्रतिभाही बहरायला हवी, तरच शिक्षणाचा ढासळलेला बुरुज थोपवता येईल.