मुंबईकरांनी शिवसेनेची साथ कधीही सोडली नाही – अनिल परब

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महापालिकेवर सत्ता स्थापन करण्याची अनेकांनी स्वप्ने पाहिली. त्यासाठी कित्येकजण आले अन् गेले. मात्र, मुंबईकरांनी शिवसेनेची साथ कधीही सोडली नाही.शिवसेनाही चांगल्या-वाईट प्रसंगात मुंबईसोबत कायम उभी राहिली आहे. मुंबईकरांना हे चांगलेच माहित आहे. त्यामुळे कोणाला साथ द्यायची, हे मुंबईकरांना चांगलेच समजते, असे सांगत मुंबई घेण्याची भाषा करणाऱ्या भाजपला नाव न घेता शिवसेना नेते व राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी टोला लगावला आहे.

करवीर निवासिनी श्रीअंबाबाई देवीच्या दर्शनासाठी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता, अनिल परब यांचे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीतर्फे स्वागत करण्यात आले. यावेळी पत्रकारांशी बोलताना, त्यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. मुंबई महापालिकेवर सत्ता स्थापन करण्याची स्वप्ने हल्ली काहीजणांना पडत आहेत. गेल्या काही दशकात यासाठी अनेकजण आले अन् गेले. पण शिवसेनेशिवाय मुंबईवर सत्ता कोणालाच स्थापन करता आली नाही. मुंबईच्या सुख-दुःखात शिवसेना कायमच ठामपणे उभी राहिली आहे. प्रत्येक संकटात मुंबईला शिवसेनेचे बळ मिळाले आहे. त्यामुळे कोणाला साथ द्यायची हे मुंबईकरांना चांगलेच माहित आहे, अशा शब्दात अनिल परब यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

वीज बिलासंदर्भात लवकरच राज्य सरकारचा अंतिम निर्णय
लॉकडाऊन काळातील वीजबिल आकारणी संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, या वीजबिल सवलतीचा अभ्यास करून कितीजणांना याचा फायदा होणार आहे. याचा सर्व अभ्यास करुन येत्या काही दिवसात राज्य सरकारकडून याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे अनिल परब म्हणाले. तसेच सध्या विरोधकांना काही काम नसल्याने,ते दररोज काहीना काही आरोप करण्याचे काम करत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.