
सातारा जिल्हा परिषद निवडणूकीच्या वेळी झालेल्या राड्यात राज्याचे मंत्री व साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांना पोलिसांनी मारहाण केल्याचे समोर आले आहे. यावरून आज विधानपरिषदेत मोठा गोंधळ झाला. विधानपरिषदेत सकाळी या मुद्द्यावरून भाजपचे मंत्री जयकुमार गोरे व शंभूराज देसाई यांच्यात शाब्दिक चकमक झाल्यानंतर सभागृह काही काळासाठी स्थगित करण्यात आलं होतं. त्यानंतर पुन्हा सभागृह सुरू झाल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार अनिल परब हे आक्रमक झाले. ”राज्यात मंत्री पोलिसांचा मार खात आहेत. भाजपकडून तुडवले जातायत, स्वत:ला वाघ समजणारे वाघ गेले कुठे? का फक्त शिवसेनेसमोर दादागिरी करायची? आहे का हिंमत सत्तेतून बाहेर पडण्याची?”‘, अशा शब्दात अनिल परब यांनी मिंधे गटाच्या मंत्र्यांना सुनावले आहे.
”आजचा दिवस महाराष्ट्रात, संपूर्ण देशात शहीद दिन म्हणून ओळखला जातो. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना आज आपण त्यांच्या बलिदानासाठी वंदन करतो. त्यांनी देशासाठी बलिदान दिलं. त्याच दिवशी महाराष्ट्राच्या राजकारणात कधीच न घडलेली गोष्ट आम्हाला, जे कधी बघितलं नाही ते बघायला मिळालं. सातार जिल्हा परिषदेची निवडणूक झाली. त्या निवडणूकीत सत्ताधारी मंत्र्यांना पोलिसांनी मारहाण केली. सत्ताधारी मंत्री पोलिसांचा मार खातायत. महाराष्ट्रात जर मंत्री मार खातायत, कार्यकर्ते मार खातायत तर सर्वसामान्य नागरिकाला सरकार म्हणून काय संरक्षण देणार आहात”, असे अनिल परब म्हणाले.
”काही वर्षापूर्वी एक उठाव केला गेला. राष्ट्रवादी आमचा स्वाभिमान चिरडतेय, अजित दादा आम्हाला घाणेरडी वागणूक देतात, फंड देत नाहीत. त्यासाठी आम्ही उठाव केला, सत्तेतून बाहेर पडलो. आम्ही सत्ता पलट केली. आम्ही वाघाचे बच्चे आहोत. आता एवढी वाईट परिस्थिती आहे या मंत्र्याची की भाजपचं मार घ्यायला घाबरतायत. कोण पोलीस? पोलिसाची हिंमत होते का? पोलीस प्यादं आहे, पोलीस मारतो तुम्हाला आणि मूग गिळून तुम्ही गप्प बसता. कुठे गेला तुमचा स्वाभिमान, कुठे गेली तुमची बंडखोरी वृत्ती. राष्ट्रवादीनेही मार खाल्ला. हिंमत असेल तर बाहेर पडा सत्तेतून. आज भाजप तुम्हाला चिरडून काढतेय आणि तुम्ही भाजपचं नाव घ्यायलाही घाबरताय, मार खाताय. जर मंत्री मार खात असेल आणि सभागृहात संरक्षण मागत आहे. हे भाजपकडून तुडवले जातायत, स्वत:ला वाघ समजणारे वाघ गेले कुठे, शेपटी घालून बसलेले आहेत. कुणाची हिंमत होत नाही भाजपचं नाव घ्यायची”‘, अशी टीका अनिल परब यांनी केली.
या सभागृहात मी बघितलं आहे परबीर सिंगने कल्याणच्या महानगरपालिकेच्या निवडणूकीत थोडा त्रास दिला तेव्हा यांच्या नेत्याने भर व्यासपीठावर राजिनामा दिला होता. कुठे गेलं ते शौर्य, कुठे गेली ती ताकद? का फक्त शिवसेनेसमोर दादागिरी करायची आणि भाजपसमोर शेपटी घालायची. हे मी कधी बघितलं नव्हतं. आज शहिद दिन आहे. शहिद व्हायचा दिवस आहे. दोन राजे मार खातायत. आज जर तुम्ही राजीनामा दिलात, सत्तेला लाथ मारून बाहेर पडलात तर तुम्हला भगतसिंगाच्या जागी बघू. आहे का हिंमत सत्तेतून बाहेर पडण्याची. आज माझा आवाज दाबण्यापेक्षा, तुमच्या बाजूला जे तुमचा आवाज दाबतायत त्यांच्या एकदा तरी कानाखाली मारून. बघा ती हिंमत दाखवा कधीतरी , असे अनिल परब यांनी ठणकावून सांगितले.

























































