सावली बारमधील ऑर्केस्ट्राचा परवाना परत केला, म्हणजे सुटका नाही; गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा हवाच! – अनिल परब

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावावर असलेल्या ‘सावली बार अँड रेस्टॉरंट’मधील ऑर्केस्ट्राचा परवाना परत करण्यात आला. यानंतर शिवसेना नेते, आमदार अॅड. अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी केली. चोराने चोरीचा माल पोलिसांना परत केला म्हणजे सुटका झाली असे नाही, असेही परब म्हणाले.

गेली कित्येक वर्ष महाराष्ट्रात बंदी असलेला डान्सबार चालवण्यात आला. आता त्यांनी ऑर्केस्ट्राचा परवाना परत केला, याचा अर्थ त्यांनी मान्य केले की तिथे अवैध काम चालू होते. अन्यथा परवाना परत करायचे कारण काय होते? असा सवाल अनिल परब यांनी केला. या प्रकरणी पोलिसांचा तपास अजूनही सुरू आहे. तपास पूर्ण होण्याआधीच चोराने चोरीचा माल पोलिसांना परत केला याचा अर्थ माझी यातून सुटका करा. पण कायद्याप्रमाणे गुन्हा घडलेला आहे. ज्या गृहराज्यमंत्र्यांवर कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी आहे, त्यांच्याच घरात महाराष्ट्रात बंदी असलेल्या गोष्टी सुरू आहेत. पण परवाना परत केला म्हणजे यातून सुटका नाही, असेही ते म्हणाले.

सावली बार अँड रेस्टॉरंटचा परवाना हा बार अँड रेस्टॉरंट चालवण्यासाठी दिला होता, डान्सबार चालवण्यासाठी नाही. अवैध धंदे करण्यासाठी, वेश्या व्यवसायासाठी आणि पिकअप पॉइंटसाठी नाही. बाकी गोष्टी सिद्ध व्हायच्या आहेत, पण तिथे डान्सबार होता हे पोलिसांनी आतापर्यंत मारलेल्या चार छाप्यातून समोर आले आहे. सावली बारवर 2023 मध्ये तीन छापे पडले होते आणि 2025 मध्ये एकदा छापा पडला, असेही परब म्हणाले.

गृहराज्यमंत्र्यांवर महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे, पण तेच कायदा सुव्यवस्था पायदळी तुडवत आहेत. एका बाजुला लाडकी बहीण म्हणत बहि‍णींचा मानसन्मान आणि दुसऱ्या बाजुला आया बहि‍णींना बारमध्ये नाचवायचे ही नैतिकता नाही. ही महाराष्ट्रासाठी शरमेची बाब आहे. इतरवेळी डान्सबारवर छापा पडतो तेव्हा परवाना धारकावरही कारवाई होते, मग इथे का करण्यात आली नाही? पोलीस राजकीय दबावाखाली असून मुख्यमंत्र्यांनी यावर कारवाई करावी आणि गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा. नाही तर मुख्यमंत्री हतबल आहात हे चित्र महाराष्ट्रात जाईल. मुख्यमंत्री हतबल झाले तर महाराष्ट्र हतबल होईल. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी कणखरपणा दाखवून माणिकराव कोकाटे, योगेश कदम या मंत्र्यांचे राजीनामे घेतलेच पाहिजे, अशी मागणी परब यांनी केली.

सावली बारवरील कारवाईचा तपशील तातडीने द्या, नाहीतर कोर्टात जाईन! अनिल परब यांची कांदिवली समतानगर पोलिसांकडे मागणी