
सामना प्रतिनिधी, नगर
उत्सवावर निर्बंध आणणारे भाजप सरकार हिंदुत्ववादी नाहीच. यांचा चेहरा वेगळाच आहे. उच्च न्यायालयाने निश्चित केलेल्या मर्यादेत स्पीकरला परवानगी दिलीच पाहिजे. प्रशासन दडपशाही करतेय. शेकडो जणांना हद्दपार केलेय. यावरून सण साजरा होऊच नये अशी त्यांची भूमिका स्पष्ट होत असल्याच्या शब्दात शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी प्रशासन व भाजपवर हल्ला चढविला आहे.
डीजेला परवानगी नाकारल्यामुळे मानाच्या गणेश मंडळानी विसर्जन मिरवणुकीवर बहिष्कार टाकला आहे. या घोषणेनंतर शिवसेनेने बहिष्काराच्या भूमिकेला पाठिंबा जाहीर केला आहे. याबाबत प्रतिक्रिया देतांना अनिल राठोड यांनी भाजप व प्रशासनाच्या धोरणावर सडकून टीका केली आहे. राठोड म्हणाले की, न्यायालयात सरकारकडून जी भूमिका मांडली गेली ती व्यवस्थित दिली असती तर ही वेळच आली नसती. प्रशासनाची दादागिरी वाढत चालली आहे. मोहरम व गणेशोत्सव हे दोन वेगळे सण आहेत. या अगोदर नगरमध्ये कृष्णप्रकाश, विश्वास नांगरे यांच्यासारखे मातब्बर अधिकारी होते. त्यांनी कधी दादागिरी केली नाही.
शहराचा इतिहास दिशा देणारा ठरला आहे, हे अनेकवेळा सिद्ध झालेले आहे. नेमकी भूमिका आवाजाबद्द्ल आहे की डीजेबद्दल आहे हे कळू शकले नाही. डीजेचे साहित्य आणूच द्यायचे नाही, ते जप्तच करायचे ही दादागिरी नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित करत त्यांनी प्रशासनावर टीका केली. उत्सव साजरे करायचे की नाही? असा प्रश्न निर्माण झालाय. एकेका गुन्ह्यावर हद्दपारी नोटीसा कशा काढल्या. यातून प्रशासनालाच उत्सव साजरा होऊ द्यायचा नाही, ही प्रशासनाची भूमिका सिद्ध होत आहे. जनतेच्या भावना दुखवू नये, असे ते म्हणाले.
खासदार दिलीप गांधी यांनी डीजे बंदीला समर्थन केल्याच्या वक्तव्यावरही त्यांनी टीका केली. त्यांनी कधी गणपती बसविला? त्यांनी कधी मंडप टाकून उत्सव साजरा केला? असे सवाल करत खासदार बालिश असल्याची खिल्ली त्यांनी उडविली. जनता त्यांना योग्यवेळी उत्तर देईलच, असा इशाराही राठोअ यांनी दिला.
राम मंदिर, ३७० कलम हटविण्याचे काय झाले?
बीजेपीचा खरा चेहरा जनतेसमोर येत आहे. राम मंदिराचे काय झाले? ३७० कलम हटविण्याचे काय झाले? महाराष्ट्रात आमचे उत्सव आम्ही साजरे करू शकत नाही. हे तर ब्रिटिश राजवटीत होत होते. ही लोकशाही राहिलीय का? असा सवाल करत अनिल राठोड यांनी सरकारही थेट हल्ला चढविला आहे.
summary- anil rathod slams bjp over dj issue


























































