83 वर्षांच्या वृद्धाला आंदोलनासाठी बोलावता यासारखे दुर्दैव नाही! अण्णांनी नाकारले भाजपचे निमंत्रण

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारविरोधातील आंदोलनात सहभागी होण्याचे भाजपचे निमंत्रण ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी नाकारले आहे. जगात सर्वाधिक पक्ष सदस्य असल्याचा दावा करणारे नेते मंदिरात 10 बाय 12 फुटाच्या खोलीत राहणाऱ्या 83 वर्षीय वृद्ध माणसाला दिल्लीत आंदोलन करण्यासाठी बोलावत आहेत यापेक्षा दुर्दैवी आणखी काय असू शकते, अशा शब्दांत त्यांनी भाजप नेत्यांना फटकारले आहे.

दिल्ली भाजपचे अध्यक्ष आदेश गुप्ता यांनी केजरीवाल सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करत भाजपच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन अण्णा हजारे यांना पत्र लिहून केले होते. भाजपचे हे आमंत्रण नाकारत हजारे यांनीही पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे. 2014 साली भ्रष्टाचारमुक्त हिंदुस्थानचे स्वप्न दाखवून तुमचे सरकार सत्तेत आले, परंतु जनतेच्या समस्या काही कमी झाल्या नाहीत. कोणताही पक्ष किंवा पार्टी सत्तेत असली तरी व्यवस्था बदलल्याशिवाय परिवर्तन होणार नाही, लोकांना दिलासा मिळणार नाही. म्हणून मी दिल्लीत येऊन काही फरक पडणार नाही, असा टोला त्यांनी लगावला आहे.

भ्रष्टाचार निर्मूलनाचे दावे निरर्थक आहेत?

पंतप्रधान नेहमीच असा दावा करतात की, केंद्र सरकारने भ्रष्टाचार निर्मूलनासाठी कठोर पावले उचलली आहेत. जर अशीच परिस्थिती असेल आणि दिल्ली सरकारने भ्रष्टाचार केला असेल तर आपले सरकार त्यांच्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई का करीत नाही? की भ्रष्टाचार निर्मूलनाचे केंद्र सरकारचे सर्व दावे निरर्थक आहेत? असा प्रश्न हजारे यांनी भाजपला केला आहे.

पक्ष किंवा पार्टी पाहून आंदोलन नाही

मी कोणताही पक्ष किंवा पार्टी पाहून आंदोलने केलेली नाहीत. मला कोणत्याही पक्षाशी घेणेदेणे नाही. फक्त गाव, समाज आणि देशाच्या भल्यासाठीच मी आंदोलन करीत आलेलो असल्याचे स्पष्ट करत हजारे यांनी भाजपला चांगलेच फटकारले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या