
मतदारयाद्यांमध्ये प्रचंड घोळ असताना त्या दुरुस्त न करता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका जाहीर करणे हे योग्य नाही. निवडणूक आयोग दुबार तिबार मतदारांच्या नावासमोर ‘स्टार’ करणार हे सांगत असले तरी ती नावे वगळून मतदार याद्या निर्दोष का करत नाही? याचे उत्तर मात्र ते देत नाहीत. आयोगाचा हा कारभारच ‘दस नंबरी’ असून ते सरकारच्या दबावाखाली काम करत असल्याचा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
टिळक भवन येथे आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांची महत्वाची बैठक पार पडली. बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, “मतचोरी करून भाजपाचे सरकार आलेले आहे, या मतचोरी विरोधात काँग्रेस पक्ष सातत्याने आवाज उठवत आहे. राज्य निवडणूक आयोगाची सर्वपक्षीय शिष्टमंडळाने भेट घेऊन मतदार याद्या दुरुस्त करण्याची मागणी केली होती. परंतु निवडणूक आयोग मात्र यावर कोणतेही समाधानकारक उत्तर देत नाही.
ते म्हणाले, “लोकशाहीमध्ये निष्पक्ष व पारदर्शक निवडणुका पार पाडणे ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे पण निवडणूक आयोग कसलीच जबाबदारी घेत नसून ते जबाबदारीपासून पळ काढत आहे. आता जनताच धडा शिकवेल.”































































