अॅण्टी व्हायरस अॅप्स स्मार्टफोनसाठी घातक

1739

आपल्या मोबाईलमधील व्हायरस आणि मालवेअर घालवण्यासाठी आपण एखाद्या अॅटी व्हायरस अॅपचा वापर करतो. पण अशा प्रकारच्या काही अॅप्समुळे व्हायरस जातो की नाही हे दूरच राहिले, युजर्सचा खासगी डेटा चोरून तो दुसऱया कंपन्यांना विकण्याची चालबाजी काही ऍण्टी व्हायरस ऍप्स करत असल्याचे ‘व्हीपीएनप्रो’ या प्रायव्हसी आणि सिक्युरिटी रिसर्च फर्मने निदर्शनास आणला आहे.

विशेष म्हणजे यातील काही अॅण्टी व्हायरस अॅप्स तर बहुतेकांच्या मोबाईलमध्ये असतातच. ती अॅप्स जवळपास 190 कोटी वेळा डाऊनलोड झाल्याची आकडेवारी आहे. याचाच अर्थ आताच्या घडीला कोटय़वधी स्मार्टफोन्सना हा धोका आहे असेही स्पष्ट झाले आहे. ‘व्हीपीएनप्रो’ या कंपनीने याबाबत म्हटले आहे की, गुगल प्ले स्टोअरवर अशी किमान 10 तरी घातक अॅण्टी व्हायरस अॅप्स आहेत, जी फोन युजर्सना फसवून त्यांच्याकडून वेगवेगळ्या परवानग्या घेतात आणि चतुराईने युजर्सच्या डेटावर डल्ला मारतात. यातील काही अॅप्स तर मोबाईलमधून डिलीट करण्यासाठीही युजर्सकडे पैशांची मागणी करतात असे दिसून आले आहे.

स्मार्टफोन्ससाठी घातक ठरत असलेल्या अॅण्टी व्हायरस ऍप्समध्ये ‘क्लीन मास्टर’, ‘सिक्युरिटी मास्टर’, ‘मॅक्स सिक्युरिटी’ अशा काही खूपच लोकप्रिय अॅप्सचाही समावेश आहे. काही दिवसांपूर्वीच अशी पाच घातक अॅप्स समोर आली होती. गुगलने ही पाचही अॅप्स आपल्या प्ले स्टोअरवरून हटविली आहेत. मात्र तरीही काही अॅण्टी व्हायरस अॅप्स अजूनही घातक असल्याचे समोर येतच आहे. ‘अॅण्टीव्हायरस फ्री’, ‘360 सिक्युरिटी’, ‘व्हायरस क्लीनर’, ‘सुपर क्लीनर’, ‘क्लीन मास्टर’ ही अॅप्सदेखील घातक असल्याचे व्हीपीएनप्रो कंपनीचे म्हणणे आहे.

आपली प्रतिक्रिया द्या