
कोरोनामुळे मानवी शरीरात तयार झालेल्या अँटिबॉडीज तपासता येणार आहेत. बंगळुरूमधल्या भारतीय विज्ञान शिक्षण संस्थेतल्या संशोधकांनी कोरोना अँटिबॉडीज तपासण्यासाठीचे एक मशीन तयार केले आहे. ‘आयसीएमआर’ने या मशीनच्या विक्रीला परवानगी दिलेली असून या मशीननिर्मितीच्या मागे असलेले संशोधक येत्या दोन ते तीन आठवडय़ांत हे मशीन बाजारात आणणार आहेत.
सोसायटी फॉर इनोव्हेशन अॅण्ड डेव्हलपमेंट तसेच इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स येथे असलेल्या पॅथशोध हेल्थकेअर या पंपनीने हे इलेक्ट्रोकेमिकल मशीन तयार केले आहे. कोरोनानंतर निर्माण झालेल्या अँटिबॉडीज तपासण्याचे हे पहिलेच मशीन असल्याचे सांगण्यात येत आहे. या तंत्रज्ञानाच्या आधारे मानवी शरीरातल्या कोरोनाच्या अँटिबॉडीज सुक्ष्मातिसूक्ष्म पातळीवरही शोधता येतील, असे ‘पॅथशोध’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सहसंस्थापक विनय कुमार यांनी सांगितले.
रक्त किंवा रक्तघटकाच्या नमुन्याच्या आधारे या अँटिबॉडीज तपासता येतील. या मशीनसोबत चाचण्यांसाठीच्या स्ट्रिप्स मिळणार आहेत. ज्यामुळे आपल्याला अँटिबॉडीजचे प्रमाण कळून येईल. या मशीनच्या स्क्रिनवर लगेचच आपल्याला या चाचणीचा निष्कर्ष पाहायला मिळेल. त्यामुळे यामध्ये कोणतीही एरर असणार नाही. यामध्ये असलेल्या चिपमध्ये एक लाखाहून अधिक चाचण्यांचे निष्कर्ष साठवून ठेवता येऊ शकतात.
‘पॅथशोध’ ही संस्था आता याच मशीनवर रॅपिड अँटिजेन टेस्ट कशी करता येईल याबद्दल संशोधन करत आहे. कोरोनाची लागण झाली की नाही याची तपासणी त्याचबरोबर अँटिजेन तपासणी दोन्हीही एकाच मशीनमध्ये करता येणारे हे पहिलेच मशीन असणार आहे.

























































