
सामना प्रतिनिधी । सिंधुदुर्गनगरी
सरकारी कामात अडथळा निर्माण करून मारहाण केल्याच्या गुन्ह्याखाली आपल्याला अटक होवू नये यासाठी गोपाळ उत्तम परब (४०) रा. कोलगाव-कुमयाळवाडी, ता. सावंतवाडी यांनी जिल्हा न्यायालयाकडे केलेला अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रधान न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांनी फेटाळून लावला आहे. सरकार पक्षातर्फे अॅड. स्वप्निल सावंत यांनी काम पाहिले.
सावंतवाडीचे वनरक्षक गोविंद व्यंकटराव केंद्रे (२८) हे २५ जानेवारी २०१९ रोजी सावंतवाडी कोलगाव बिट कार्यक्षेत्रात मोटारसायकलवरून गस्त घालत असतांना गोपाळ परब यांची ओमनी कार दिसली. कारमधून लाकूड वाहतूक होत असल्याचा संशय आल्याने केंद्रे यांनी ओमनी कारला थांबण्याचा इशारा केला. मात्र कार चालक कार न थांबविता तेथून पळाला. यावेळी वनरक्षक केंद्रे यांनी परब यांचा घरापर्यंत पाठलाग केला आणि वाहनाची तपासणी केली असता आत सागवानी चिरलेले लाकूड़ आढळून आले. त्यामुळे या लाकूड़ वाहतुकीचा परब यांच्याकडे केंद्रे यांनी पास मागितला. त्याचा राग आल्याने परब यांनी केंद्रे यांना धक्का देत तेथील रिपने केंद्रे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यात केंद्रे यांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली होती.
केंद्रे यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. तर सरकारी कामात अडथळा आणि मारहाण केल्या प्रकरणी गोपाळ परब यांच्या विरोधात ३५३, ३३३, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी परब यांनी जिल्हा न्यायालयात अर्ज केला होता. यावर शुक्रवारी सुनावणी होऊन हा अटकपूर्व जामीनाचा अर्ज फेटाळण्यात आला होता.


































































