देशभरातील व्यापारी, दुकानदारांची होणार अँटिजेन टेस्ट, मनपा आयुक्तांचा पॅटर्न राबविण्याचा केंद्राचा निर्णय

868

कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शहरातील व्यापारी, दुकानदार, फिरते विक्रेते यांची अँटिजेन चाचणी करण्याचा निर्णय संभाजीनगर मनपा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी घेतला. या निर्णयाची कठोरपणे अंमलबजावणी होताच त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले. आयुक्तांनी हाती घेतलेल्या या पॅटर्नची आता देशभरात अंमलबजावणी केली जाणार आहे. केंद्र सरकारने देशभरातील व्यापारी, दुकानदार यांची अ‍ॅण्टिजेन चाचणी करण्याचा निर्णय घेतला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भुषण यांनी राज्य व केंद्रशासित प्रदेशांना पत्र पाठवले आहे, अशी माहिती आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिली.

संभाजीनगर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी नऊ दिवसाचा लॉकडाऊन जाहिर करण्यात आला होता. या दरम्यान राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी अँटिजेन टेक्नॉलॉजीचा वापर करण्याची सूचना आयुक्तांना केली होती. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळातच मनपा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी शहरातील नागरिकांच्या अँटिजेन टेस्ट करण्यावर भर दिला. कोरोना रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींची शोध मोहिम सूरू असताना त्यामध्ये व्यापारी, दुकानदार, विक्रेते यांच्या संपर्कात आल्यामुळे कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले.

शहरातील सर्व व्यापारी, दुकानदार, फिरते विक्रेते, भाजी व फळ विक्रेते यांना अँटिजेन चाचणी करण्याची सक्ती करण्यात आली. याशिवाय आयुक्तांनी ‘एमएचएमएच अ‍ॅप’, एक हजार मोबाईल फिवर क्लिनिक (एमएफसी), सिटी एन्ट्री पॉईंटवर तपासणी, 24 बाय 7 अंतर्गत चालणारे कंन्ट्रोल रूम, सिटी बसचा अ‍ॅम्बुलन्स म्हणून वापर, स्पेशल टास्क फोर्स ही सात सुत्री संकल्पना कोरोना बाधितांचा शोध घेण्यापासून उपचारापर्यंत वापरली. या संकल्पनेस अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळाल्याचे दिसून आले.

मनपा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी शहरात राबविण्यात आलेल्या पॅटर्नचे अनुकरण आता केंद्र सरकार करणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी राज्य व केंद्रशासित प्रदेशांना पाठवलेल्या पत्रात व्यापारी, दुकानदारांची कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी अँटिजेन चाचणी करण्याचे निर्देश दिले आहे. किराणा दुकाने, भाजीपाला आणि इतर विक्रेते आदी ठिकाणांहून मोठया संख्येने कोरोना संक्रमणाचा प्रसार होऊ शकतो. अशा क्षेत्रात आणि अशा लोकांची चाचणी आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कृतीशीलपणे करायला हवी. वृध्द व्यक्ती, अल्पवयीन मुले, गर्भवती महिला ज्यांना कोरोनाचा धोका आहे, अशा लोकांची ओळख पटविण्यासाठी नियमितपणे घरोघरी शोध घेणे गरजेचे असल्याचे राजेश भूषण यांनी पत्रात नमुद केले आहे. दरम्यान, हे सर्व प्रयोग संभाजीनगर मनपा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी जून आणि जुलै महिन्यापासूनच सुरू केले होते. त्यांच्या संकल्पनेतील पॅटर्नचे सकारात्मक परिणाम समोर आल्यानंतर केंद्र सरकारने हा पॅटर्न राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

महापालिकेचे हे यश
शहरात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी व संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सात सुत्री संकल्पनेसह व्यापारी, दुकानदार, विक्रेते यांची अँटिजेन चाचणी करण्याचा निर्णय अंत्यत सकारात्मक ठरला. महापालिकेने राबविलेल्या या मोहिमेची देशभरात अंमलबजावणी केली जाणार आहे. वास्तविक हे महापालिकेचे यश आहे. संभाजीनगर महापालिका चांगले करु शकते हे दाखवून दिले, असे मनपा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या