
एपीएमसीतील मसाला मार्केटमधील व्यापाऱ्याला कोरोनाची लागण झाल्यानंतर बंद ठेवण्यात आलेले धान्य मार्केट गुरुवारपासून सुरू झाले. भाजीपाला, कांदा-बटाटा आणि मसाला मार्केटपाठोपाठ धान्य मार्केटही सुरू झाल्यामुळे मुंबईकरांची चिंता मिटली आहे.
कोकण विभागीय आयुक्त शिवाजीराव दौंड यांनी केलेल्या कृती आराखड्यानुसार एपीएमसीचे भाजीपाला, कांदा-बटाटा आणि मसाला मार्केट बुधवारपासून सुरू झाले असले तरी धान्य मार्केट बंदच होते. यासंदर्भात राज्याचे नगरविकासमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे यांनी बुधवारी व्यापाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. त्यानंतर धान्य मार्केटमधील व्यापाऱ्यांनी गुरुवारपासून मालाची खरेदी-विक्री सुरू केली.
सोशल डिस्टन्सिंग काटेकोर पालन
सर्वच मार्केटमध्ये प्रवेश करणाऱ्या ग्राहकांसाठी सोशल डिस्टन्सिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रशासनाकडून सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन केले जात आहे. व्यापाऱ्यांनी आणि ग्राहकांनी या सोशल डिस्टन्सिंगला सहकार्य करावे, असे आवाहन एपीएमसीचे सचिव अनिल चव्हाण यांनी केले आहे.



























































