प्राण्यांच्या वैद्यकीय चाचणीसाठी 20 रुपये घ्या; हायकोर्टात अर्ज

प्राण्यांच्या वैद्यकीय चाचणीसाठी 200 रुपये शुल्क आकारण्याचा नवीन नियम राज्य शासनाने जारी केला आहे. आधी यासाठी 20 रुपये शुल्क आकारले जात होते. यंदाच्या बकरी ईदला 20 रुपयेच शुल्क घ्यावे, अशी विनंती करणारा अर्ज उच्च न्यायालयात दाखल करण्यात आला होता.

न्या. मिलिंद साठये व न्या. सोमशेखर सुंदरेसन यांच्या सुट्टीकालीन खंडपीठासमोर या अर्जावर सुनावणी झाली. खंडपीठाने यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश अल कुरेशी ह्युमन वेल्फेअर असोसिएशनला दिले.

आम्ही असोसिएशनचा अर्ज निकाली काढत आहोत. वाढीव वैद्यकीय चाचणी शुल्काविरोधात दाखल असलेल्या मूळ जनहित याचिकेवर कोर्टाची सुट्टी संपल्यानंतर सुनावणी होईल, असे खंडपीठाने स्पष्ट केले.

वाढीव शुल्क परवडणारे नाही
– जून महिन्यात बकरी ईद आहे. ईदच्या दहा ते बारा दिवस आधीच देवनार कत्तल खान्यात प्राणी आणले जातात. महाराष्ट्रातील कानाकोपऱयातून शेतकरी त्यांचे प्राणी घेऊन देवनार येथे येतात. त्यांना वाढीव शुल्क परवडणारे नाही. गेल्या वर्षी 20 रुपये शुल्क आकारण्यात आले होते. या वर्षी 17 ते 19 जून या कालावधीसाठी वाढीव शुल्क कमी करण्याचे आदेश न्यायालयाने द्यावेत, अशी विनंती असोसिएशनच्या वतीने करण्यात आली होती.

असोसिएशनने थेट अर्ज केला
असोसिएशनच्या अर्जाला सरकारी वकील ज्योती चव्हाण यांनी विरोध केला. शुल्क कमी करण्यासाठी गेल्या वर्षी राज्य शासनाकडे प्रस्ताव देण्यात आला होता. त्यानुसार शुल्क कमी करण्यात आले होते. या वर्षी तसा काहीही प्रस्ताव आलेला नाही. थेट उच्च न्यायालयात अर्ज करण्यात आला आहे. असोसिएशनने शासनाकडे प्रस्ताव सादर करावा. त्यावर निर्णय घेतला जाईल, असे अॅड. चव्हाण यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले.

दोन वर्षांपूर्वी लागू केला नियम
दोन वर्षांपूर्वी राज्य शासनाने नवीन नियम लागू केला आहे. यावर आताच तातडीने सुनावणी घेण्यासारखा काहीच मुद्दा नाही. गेल्या वर्षी राज्य शासनाने शुल्कात सवलत दिली असेल तर या वर्षी तसा प्रस्ताव असोसिएशनने नव्याने सादर करावा. या प्रस्तावावर राज्य शासनाने निर्णय घ्यावा, असे आदेश न्यायालयाने दिले.