
सध्याची सामाजिक परिस्थिती, पालकांची विद्यार्थ्यांकडून वाढलेल्या अपेक्षा, तरुणांमध्ये अमली पदार्थ सेवनाचा पडलेला विळखा यामुळे विद्यार्थ्यांची मानसिकता ढासळत चालली आहे. त्यांना योग्य वेळी या सर्व निराशाजनक मनःस्थितीतून बाहेर काढण्याकरिता त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. त्या पार्श्वभूमीवर, मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सर्व महाविद्यालयांमध्ये किमान एक समुपदेशक नेमावा. त्यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक तणावातून मुक्त होण्यास सहकार्य होईल तसेच विद्यार्थ्यांचा वावर असलेल्या प्रत्येक परिसरात सीसीटीव्ही बसवावा, अशी मागणीही युवासेनेच्या सिनेट सदस्यांनी विद्यापीठ प्रशासनाकडे केली आहे.
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी विलेपार्ले येथील साठये महाविद्यालयातील विद्यार्थिनीचा तिसऱया मजल्यावरून पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची गंभीर दखल घेत याबाबत युवासेना सिनेट सदस्यांनी विद्यापीठ प्रशासनाकडे पाठपुरावा करावा, अशी सूचना केली. त्या पार्श्वभूमीवर, सूचनेनुसार मुंबई विद्यापीठाचे प्र. पुलगुरू डॉ. अजय भामरे यांची शिवसेना उपनेत्या शीतल शेठ-देवरुखकर, प्रदीप सावंत, शशिकांत झोरे आणि माजी सिनेट सदस्य राजन कोळंबेकर यांनी भेट घेतली आणि विद्यार्थ्यांची सुरक्षा तसेच मानसिक आरोग्य, समुपदेशक याबद्दल निवेदन दिले. निवेदनात मुंबई विद्यापीठाशी संबंधित महाविद्यालयांमध्ये मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी समुपदेशक नेमावा तसेच विद्यार्थ्यांचा वावर असलेल्या परिसरात सुरक्षेसाठी सीसीटीव्ही लावावा, अशी मागणी सिनेट सदस्यांनी निवेदनात केली आहे.