‘एप्रिल मे 99’ जूनमध्ये सुसाट

मापुस्कर बंधूंच्या ‘एप्रिल मे 99’ या चित्रपटाने थिएटरमध्ये सलग 30 दिवस पूर्ण करत महत्त्वाचा टप्पा गाठला. या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. 90 च्या दशकातील निरागस मैत्री, उन्हाळी सुट्टीची मजा आणि शाळेच्या खूप सार्या आठवणी प्रेक्षकांनी नॉस्टॅल्जिक करत आहेत आणि त्यामुळेच हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. ‘एप्रिल मे 99’ मध्ये साजिरी जोशी, श्रेयस थोरात, मंथन काणेकर आणि आर्यन नेंगजी यांनी धम्माल केली आहे. प्रभावी कथानकासह रोहन- रोहन यांचे संगीत आणि गाणीही मनाला भिडत आहेत. चित्रपटाच्या यशाबद्दल मापुस्कर बंधूंनी आनंद व्यक्त केला. दिग्दर्शक रोहन मापुस्कर म्हणाले, हे माझे पहिले दिग्दर्शन असून प्रेक्षकांनी हा चित्रपट मनापासून स्विकारला, याचा खूप आनंद होतोय. हा चित्रपट प्रेक्षकांसह कलाकार आणि समीक्षकांच्याही पसंतीस उतरत आहे, हे पाहून मन भरून येतंय. हे यश माझे एकटयाचे नसून चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे आहे, कलाकारांचे आणि प्रेक्षकांचे आहे. निर्माते राजेश मापुस्कर यांनीही प्रेक्षकांचे आभार मानले.