
इचलकरंजी येथील शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी आपटे वाचन मंदिरातर्फे 2024 सालच्या विविध साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यामध्ये ठाण्यातील तरुण कवी संकेत म्हात्रे यांच्या ‘तिथे भेटूया मित्रा’ या काव्यसंग्रहाला विशेष उल्लेखनीय पुरस्कार मिळाला. विविध पुरस्कारांची घोषणा ग्रंथालयाच्या अध्यक्षा सुषमा दातार व इचलकरंजी साहित्य संमेलन स्मृती ट्रस्टचे सचिव डॉ. श्रीवल्लभ मर्दा यांनी केली.
संकेत म्हात्रे गेल्या 15 वर्षांपासून कवितेच्या प्रांतात मुशाफिरी करत आहेत. एकीकडे जाहिरात क्षेत्रात कार्यरत असताना काव्यलेखन, काव्यवाचन, काव्यानुवाद, गीतलेखन, संपादन आणि काव्यपटांची निर्मिती आणि दिग्दर्शनाच्या क्षेत्रात व्यस्त आहेत. काव्योत्सव – 2001 या जगातल्या पहिल्या कन्नड मराठी काव्य महोत्सवात त्यांचा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सहभाग होता. ‘क्रॉसओव्हर पोएम्स’ या बहुभाषिक कार्यक्रमाचे आयोजनही त्यांनी केले होते. याशिवाय अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय महोत्सवात त्यांचा सहभाग असतो. संकेत म्हात्रे यांचा पहिला इंग्रजी कवितासंग्रह ‘अ सिटी फूल ऑफ सायरन’ वर्षभरापूर्वी प्रकाशित झाला. काही मालिकांची शीर्षकगीतं आणि गीतलेखनही ते सातत्याने करत आहे. ‘नवंकोरं’ या नवीन पिढीच्या मराठी कवितांच्या कार्यक्रमाचे प्रयोग संकेत म्हात्रे, प्रथमेश पाठक, आदित्य दवणे आणि अभिनेत्री स्पृहा जोशी यांच्यासह सादर करत आहेत.