
राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मंगळवारी संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी उपसभापती हरिवंश यांच्यावर सदनाच्या कारभारावरून प्रश्न उपस्थित केला आणि थेट गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला. खरगे यांनी उपसभापतींना विचारले, “सदन कोण चालवत आहे, तुम्ही की अमित शहा?” हा प्रश्न त्यांनी केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या (CRPF) कथित उपस्थितीवरून आणि विरोधकांच्या आवाज दाबण्याच्या आरोपावरून केला.
मल्लिकार्जुन खरगे यांनी आरोप केला की, सरकार विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी सीआयएसएफसारख्या अर्धसैनिक दलांचा वापर करत आहे, जे लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांचे उल्लंघन आहे.
ते म्हणाले, “जर सीआयएसएफ किंवा कोणतेही अर्धसैनिक दल आमचा आवाज दाबण्यासाठी सदनात आणले गेले असेल, तर हे अत्यंत निंदनीय आहे आणि लोकशाहीच्या मूल्यांचा अपमान आहे.” ते माजी विरोधी पक्षनेते अरुण जेटली आणि सुषमा स्वराज यांचा उल्लेख करत म्हणाले की, त्यांनीही अशा प्रकारच्या व्यत्ययांना लोकशाहीचा भाग मानले होते.