
केस धुतल्यानंतर तुमचे केस पुंजक्याने गळतात का? दररोज सकाळी केस विंचरतानाही तुमचे केस गळतात का या प्रश्नांची उत्तरं हो असेल तर आत्ताच तुम्ही केसांच्या बाबतीत सजग व्हा. केस गळतीवर अनेक उपाय करुन थकले असाल तर, आता हे साधे सोपे घरगुती उपाय करा, तुम्हाला लगेच आराम मिळेल.
कोमट तेलाने मालिश करा: आठवड्यातून दोनदा, हलके कोमट नारळ, बदाम किंवा एरंडेल तेलाने केसांची मालिश करणं हे खूप गरजेचं आहे. यामुळे रक्ताभिसरण सुधारते तसेच केसांच्या मुळांनाही चांगले पोषण मिळते. यामुळे केसगळतीची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होते.
आवळा: ताज्या आवळ्याचा रस किंवा त्याची पावडर केसांना लावल्याने केस मजबूत होतात. यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी कोलेजनचे उत्पादन वाढवते आणि केसांची वाढ जलद होते.
कांद्याचा रस: कांद्याचा रस टाळूवर लावल्याने केसांची मुळे मजबूत होतात. त्यात सल्फर असते, जे केसांच्या रोमांना पुन्हा सक्रिय करते आणि नवीन वाढीस प्रोत्साहन देते.
दही आणि मधाचा हेअर पॅक: दह्यामध्ये असलेले प्रथिने आणि मधातील ओलावा एकत्रितपणे केसांना आतून पोषण देतात. आठवड्यातून एकदा हा पॅक लावल्याने केस मऊ, जाड आणि चमकदार दिसतील.
ताण कमी करा: केस गळतीची समस्या ही ताणामुळे सुद्धा होते. स्ट्रेस हार्मोन्स केसांची मुळे कमकुवत करतात. ध्यान, योग आणि चांगली झोप तुमचे केस निरोगी ठेवतात.
योग्य आहार : दररोज प्रथिने, लोह, बायोटिन आणि व्हिटॅमिन ई (जसे की अंडी, अंकुरलेले धान्य, सुकामेवा, पालक इ.) समृद्ध असलेले पदार्थ खा. यामुळे केसांना आतून ताकद मिळते आणि केस गळणे थांबते.