
सामना प्रतिनिधी । अलिबाग
पोलीस उपनिरीक्षक अश्विनी बिद्रे खून प्रकरणात शनिवारी अलिबाग सत्र न्यायालयात सरकारी पक्षातर्फे आरोप निश्चितीपूर्वीचा युक्तिवाद पूर्ण झाला. विशेष सरकारी वकील अॅड. प्रदीप घरत यांनी सत्र न्यायाधीश मलशेट्टी यांच्यासमोर हा युक्तिवाद केला. बचाव पक्षाला आपला आरोप निश्चितीपूर्वीचा युक्तिवाद करण्यासाठी 3 जून ही तारीख देण्यात आली आहे.
अश्विनी बिद्रे खून प्रकरणातील यापूर्वीच्या 3 तारखांना संबंधीत पोलीस अधिकारी न्यायालयात हजर राहिले नव्हते, त्यामुळे सरकारी वकील प्रदीप घरत यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसे पत्र नवी मुंबई पोलीस आयुक्तांना पाठवले होते. त्यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त अजय कदम यांनी प्रदीप घरत यांची भेट घेऊन तपासात पूर्णपणे सहकार्य करण्याचे मान्य केले. त्यानुसार शनिवारी पोलीस अधिकाऱ्यांनी न्यायालयात हजेरी लावली. यावेळी सरकारी वकिलांनी आरोपींवर कोणते आरोप निश्चित करायचे याबाबत न्यायालयासमोर आपला युक्तिवाद केला. तर 3 जून रोजी बचाव पक्षातर्फे युक्तिवाद केला जाणार आहे.


























































