अर्जुन तेंडुलकरनं गुपचूप उरकला सारखपुडा; बालपणीच्या मैत्रिणीसोबत करणार लग्न, कोण आहे सचिनची होणारी सून?

टीम इंडियाचा माजी खेळाडू, भारतरत्न सचिन तेंडुलकर याचा मुलगा क्रिकेटपटू अर्जुन तेंडुलकर याचे हात लवकरच पिवळे होणार आहेत. अर्जुन तेंडुलकर याने बालपणीच्या मैत्रिणीसोबत गुपचूप सारखपुडा उरकून घेतला आहे. मुंबईतील प्रसिद्ध उद्योजक रवी घई यांची नात सानिया चांडोक सचिनच्या घरची सून होणार असून मोजक्या लोकांच्या उपस्थितीत उभयंतांचा साखरपुडा पार पडल्याचे वृत्त ‘इंडिया टूडे‘ने दिले आहे. अर्थात सचिन किंवा चांडोक कुटुंबाने याबाबत अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही.

सचिनचा मुलगा अर्जुन हा देखील क्रिकेटपटू आहे. अर्जुन डावखुरा गोलंदाज असून उत्तम फलंदाजीही करतो. 25 वर्षाचा अर्जुनने देशांतर्गत क्रिकेटमध्येही चांगली कामगिरी केलेली आहे. आयपीएलमध्ये तो मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधित्व करतो. टीम इंडियामध्ये स्थान मिळवण्यासाठीही तो प्रयत्न करत आहे, मात्र अद्याप त्याला संधी मिळालेली नाही. अशातच त्याचा सारखपुडा झाला आहे.

मुंबईत गुपचूप उरकला साखरपुडा

अर्जुन आणि सानिया यांचा साखरपुडा मुंबईतच जवळच्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी दोन्ही कुटुंबातील जवळचे सदस्य आणि मित्र उपस्थित होते. सानियाचे आजोबा रवी घई हे सचिन तेंडुलकर याचेही मित्र असून मुंबईतील इंटरकॉन्टिनेंटल मरीन ड्राइव्ह हॉटेल आणि ब्रुकलिन क्रीमरी अर्थात कमी कॅलरीज असलेल्या आइस्क्रीम ब्रँडचे मालक आहेत.

कोण आहे सचिनची होणारी सून?

अर्जुन तेंडुलकर याचा सानिया चांडोक हिच्याशी साखरपुडा झाला असून लवकरच दोघांच्या लग्नाचा बार उडणार आहे. सानिया ही प्रसिद्ध उद्योजक रवी घई यांची नात आहे. सानिया ही अर्जुनची बालपणीची मैत्रीण असून सारा तेंडुलकर हिच्याशीही तिची चांगली गट्टी जमते. दोघींचे अनेक फोटोही आता समोर आले आहेत. अनेक व्हिडीओंमध्येही दोघी सोबत दिसत आहेत. सानिया सोशल मीडियावर जास्त सक्रिय नाही. मात्र केंद्र सरकारच्या कॉर्पोरेट अफेअर्सच्या माहितीनुसार, सानिया ही डेसिगन्टेड पार्टनर आणि संचालक म्हणून मिस्टर पॉज पेट स्पा अँड स्टोअर एलएलपीमध्ये कार्यरत असून संचालकही आहे.

अर्जुनची कारकिर्द

अर्जुन तेंडुलकर याने प्रथम श्रेणीचे 17, लिस्ट एचे 18 आणि 24 टी-20 सामने खेळले आहेत. प्रथम श्रेणीमध्ये त्याच्या नावावर 532 धावा आणि 37 विकेट्सची नोंद आहे, तर लिस्ट एमध्ये त्याने 102 धावा केल्या असून 25 विकेट्सही घेतल्या आहेत. टी20 मध्ये त्याने 119 धावा केल्या आहेत, आणि 27 विकेट्सही घेतलेल्या आहेत. सध्या तो गोव्याकडून प्रथमश्रेणी क्रिकेट खेळत आहे.