
सामना ऑनलाईन | कोलंबो
विश्वविक्रमादित्य क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदापर्णाच्या सामन्यातच बळी मिळण्याचा पराक्रम केला. हिंदुस्थानच्या १९ वर्षांखालील संघाचे प्रतिनिधित्व करताना त्याने पहिलाच बळी टिपण्याची करामत केली. कोलंबो येथे सुरू झालेल्या १९ वर्षांखालील श्रीलंका संघाविरुद्धच्या पहिल्या युवा कसोटी सामन्यात १२ चेंडूंत अर्जुनने पहिला बळी टिपला. त्याने दुसऱ्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर श्रीलंकेचा सलामीवीर कामिल मिश्राला एका भन्नाट चेंडूवर पायचित केले.
श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. हिंदुस्थानी संघाचा कर्णधार अनुज रावतने पहिले षटक टाकण्यासाठी चेंडू अर्जुनच्या हाती दिला. कर्णधाराने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवताना अर्जुनने दुसऱयाच षटकात हिंदुस्थानला पहिले यश मिळवून दिले. १५ वर्षीय अर्जुनने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करताना आक्रमक फलंदाजी करणाऱया कामिला मिश्राला बाद केले. त्याने ११ चेंडूंत दोन चौकार लगाकताना ९ धावा केल्या होत्या. दरम्यान, हिंदुस्थानने श्रीलंकेचा पहिला डाव २४४ धावांवर संपवला. अर्जुन तेंडुलकरव्यतिरिक्त हिंदुस्थानकडून हर्ष त्यागी आणि आयुष बादुनी यांनी ४-४ फलंदाज बाद केले. आशीष कपूर, ज्ञानेंद्र पांडे, राकेश पारिख यांच्या निवड समितीने अर्जुन तेंडुलकरची संघात निवड केलेली आहे. या दौऱयातील कसोटी संघाचे नेतृत्व दिल्लीचा यष्टिरक्षक फलंदाज अनुज रावतकडे देण्यात आलेआहे.




























































