बिहारमध्ये मुसळधार पावसाने अक्षरशः थैमान घातले असून मुजफ्फरपूर जिह्यातील घनशामपूर येथील बेसी बाजार येथे बचावकार्य करताना लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले. या दुर्घटनेत एक जवान जखमी झाला. घटनेनंतर घटनास्थळी बचावकार्य करणाऱया इतर जवानांच्या आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी जवानांना सुरक्षित स्थळी नेण्यात आले. हेलिकॉप्टर सीतामढीच्या दिशेने जात होते. हेलिकॉप्टरमधून पूरग्रस्तांसाठी अन्नाची पाकिटे फेकण्यात येत होती. याचदरम्यान, हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती आहे. दरम्यान, पायलटने प्रसंगावधान राखत हेलिकॉप्टर पाण्यात उतरवल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. सर्व जवान आणि पायलट सुरक्षित असल्याची माहिती आहे.
बिहारमध्ये सध्या पूरस्थिती निर्माण झाली असून घरे, रस्ते, पूल, इमारती सगळेच पाण्याखाली गेले आहेत. शेकडोजण बेघर झाले आहेत. बिहारमधील गंडक, कोसी, बागमती, कमला बालन आणि गंगा यांसह अनेक नद्यांना पूर आला आहे. लाखो लोकांचे जीवन संकटात आहे. लष्कराच्या तुकडय़ा बचावकार्य करत असून अनेक ठिकाणी महापुरामुळे बचावकार्यात अनेक अडथळे येत असल्याचे चित्र आहे.