श्रीगोंद्याचा शहीद जवान कपिल गुंड पंचत्वात विलीन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । श्रीगोंदा

नगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील अजनुज येथील कपिल नामदेव गुंड (26) यांना गुरुवारी रात्री झालेल्या स्फोटात वीरमरण आले आहे. जम्मू-कश्मीरच्या उधमपूरमधील ओडी सेक्टर काला पहाड येथे ही घटना घडली. गुंड यांच्या पार्थिवावर सोमवारी अजनुज येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शहीद गुंड यांच्या अंत्यवीधिसाठी नागरिकांनी मोठी गर्दि केली होती.

अजनुज येथे नामदेव गुंड यांचे कुटुंब वास्तव्यास आहे. नामदेव गुंड हे लष्करी सेवेतून निवृत्त झाले आहेत. त्यांना दोन मुले असून मोठा मुलगा कपिल चार वर्षांपूर्वी लष्करी सेवेत दाखल झाला होता. गुरुवारी रात्री उधमपूर येथे कपिल आणि त्यांचा सहकारी कर्तव्य बजावत होते. त्याच दरम्यान झालेल्या स्फोटात कपिल आणि त्यांचा सहकारी गंभीर जखमी झाले. दोघांवर लष्करी रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र मोठ्या प्रमाणावर जखमी असलेल्या कपिल गुंड यांना वीरमरण आले.

कपिल गुंड यांचे शव जम्मू-कश्मीर येथून विमानाने पुण्यापर्यंत आणले. तेथून लष्करी वाहनातून अजनुज या त्यांच्या मुळ गावी आणले. सोमवारी भीमा नदीकाठी शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.  शहीद कपिल यांच्या पश्चात वडील, आई, पत्नी, सव्वा वर्षाचा मुलगा अनुष्कार, तीन वर्षाची मुलगी अनुष्का आणि भाऊ असा परिवार आहे.