घरफोडी आणि वाहनचोरी करणाऱ्या सराईताला अटक

शहरातील विविध भागांत जबरी चोरी, घरफोडी आणि वाहनचोरी करणाऱ्या सराईताला गुन्हे शाखेच्या युनिट सहाने अटक केले. त्याच्याकडून मोटार, दुचाकी, दागिने मिळून 6 लाख 45 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. त्याशिवाय 9 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. अमरसिंग जगरसिंग टाक (रा. गोसावी वस्ती, हडपसर ) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

गुन्हे शाखेचे पथक हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना घरफोडी आणि वाहनचोरी करणाऱ्या सराईत अमरसिंग टाकला पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत त्याने लोणी काळभोर परिसरातून साथीदार जयपालसिंग उर्फ मोन्यासिंग टाक याच्या मदतीने तरूणाची मोटार जबरदस्तीने चोरून नेल्याची कबुली दिली. अधिक चौकशीत अमरसिंग याने पुणे शहर, पिंपरी-चिंचवड परिसरात विविध ठिकाणी घरफोडी आणि वाहनचोरीचे गुन्हे केल्याचे उघडकीस आले. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश माने, मच्छिंद्र वाळके, राहूल माने, ऋषिकेश टिळेकर, प्रतिक लाहीगुडे, शेखर काटे, नितीन धाडगे, संजय देशमुख यांच्या पथकाने केली.

आपली प्रतिक्रिया द्या