वाहतूक कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करणारा अटकेत

रस्त्याच्या मध्यभागी दुचाकी लावून वाहतूकीला अडथळा निर्माण करणाऱ्या तरुणाला दुचाकी बाजूला घे, असे सांगितल्यामुळे तरुणाला वाहतूक कर्मचाऱ्याचा राग आला. त्यामुळे त्याने वाहतूक कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केली.

याप्रकरणी सुरज विजय घोडके (24, रा. काळेवाडी) याला कोंढवा पोलिसांनी अटक केली. ही घटना काल दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास कोंढवा स्मशानभूमीलगत रस्त्यावर घडली. पुंडलिक गवळी यांनी या घटनेबाबत तक्रार दाखल केली आहे. कोंढवा वाहतूक विभागात गवळी कार्यरत आहेत. काल दुपारी तीनच्या सुमारास स्मशानभूमी रस्त्यावर एक तरुण मध्यभागी दुचाकी लावून वाहनचालकांना शिवीगाळ करीत होता. त्यामुळे गवळी त्यांच्या सहकाऱ्यासोबत त्या ठिकाणी गेले. त्यांनी तरुणाला दुचाकी बाजूला घेण्यास सांगितले. याचा राग आल्यामुळे आरोपी सुरजने गवळी यांना धक्काबुक्की केली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील पाटील तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या