लेख – बांगलादेशातील हिंदूंचे संरक्षण करा!

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन, [email protected]

बांगलादेशातील बदललेल्या परिस्थितीत भारताने तेथील सत्ताधारी पक्ष व विरोधी पक्षांशी चांगले संबंध प्रस्थापित करणे आवश्यक आहे. भारताने त्या देशाला मदत करताना सावध राहून अल्पसंख्याक हिंदूंचे संरक्षण होतेय का, हे पाहायला हवे. बांगलादेशात हिंदूंचा छळ झाला तर त्याचे परिणाम भारतासोबतच्या संबंधांवर होतील व ते परराष्ट्र धोरणाच्या दृष्टीने नुकसानकारक आहे, याची जाणीव बांगलादेशला करून द्यायला हवी.

बांगलादेशात नुकतेच मोहम्मद युनूस यांचे अंतरिम सरकार स्थापन झाले. बैठकीत हिंदूंच्या सुरक्षेबाबत चर्चा केली गेली. तेथील 52 जिह्यांत हिंदूंवर दोनशेहून अधिक हल्ले झाले. बांगलादेशातील युनूस सरकारने हिंदूंवर झालेल्या हिंसेबाबत चिंता व्यक्त केली. बांगलादेशातील हिंदू आपल्या सुरक्षेविषयी अत्यंत घाबरले आहेत. याचबरोबर काहींनी भारतीय सीमेवर पलायन केले आहे.

आज दोन कोटी हिंदू बांगलादेशमध्ये आहेत. पाकिस्तानातील हिंदूंची संख्या 1950 मध्ये 8 ते 9 टक्के होती, ती आज पाच लाखांवर म्हणजे एक टक्क्याहून कमी झालेली आहे. पूर्व पाकिस्तानात (आताच्या बांगलादेशात) फाळणीनंतर 1950 मध्ये 24 ते 25 टक्के हिंदू होते. बांगलादेशात आज केवळ 8.6 टक्के हिंदूच शिल्लक उरले आहेत. बाकी 16 टक्के हिंदू गेले कुठे? ते मारले गेले किंवा त्यांनी धर्म परिवर्तन केले किंवा काही भारतामध्ये पळून आले.

शेख हसीना यांच्या सरकारपुढील इस्लामी मूलतत्त्ववादाचे आव्हान अत्यंत बिकट होते. अवघ्या पाच दशकांपूर्वी ‘एक धर्म एक राष्ट्र’ अशा वैचारिक मांडणीस पूर्णपणे नाकारून बंगाली अस्मितेवर आधारलेल्या राष्ट्रवादाचा पुरस्कार केलेल्या बांगलादेशमध्ये इस्लामी मूलतत्त्ववादाच्या प्रभावामुळे ‘आमार शोनार बांगला’ची वाटचाल आता वहाबी मूलतत्त्ववादाकडे सुरू आहे. हिंदूंसह ख्रिश्चन, बौद्ध यांच्यासारखे अल्पसंख्याक जीव मुठीत घेऊनच राहत आहेत. त्यांना येथील कडव्या मूलतत्त्ववाद्यांच्या अत्याचारांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अल्पसंख्याक बांगलादेशींचे भारतात पळून येण्याचे प्रमाण वाढू शकते.

1971 च्या युद्धात झालेला 35-40 लाख हिंदूंचा वंशविच्छेद अमेरिकन पत्रकार गॅरी बासला जगासमोर आणावा लागला. अमेरिकन ज्यू व मानतावादी कार्यकर्ता डॉ. रिचर्ड बेन्किन बांगलादेशातील अल्पसंख्याकांसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर वैचारिक व कायदेशीर मार्गाने लढतोय. भारतातील तथाकथित पुरोगामी, सेक्युलर्स, मानवतावादी, बुद्धीवादी विचारवंत बांगलादेशात होणाऱया हिंदू-बौद्ध हत्याकांडाविषयी काही अपवाद वगळता गप्प का बसतात?

भारतात स्थलांतरित झालेल्यांची संपत्ती बांगलादेश सरकारने ताब्यात घेतली. पाकिस्तानने 1965च्या युद्धादरम्यान भारतीयांना शत्रू घोषित करून ‘शत्रू संपत्ती निर्बंध 1965’ लागू करून भारतीयांची (मुख्यत्वेकरून हिंदू व बौद्धांची) पूर्व व पश्चिम पाकिस्तानात असलेली संपत्ती ताब्यात घेतली होती. बांगलादेशाने स्वातंत्र्यानंतर ‘Vesting of Property and Assets Order 1972’ लागू करून, यानुसार कुठल्याही निर्बंधाखालील पाकिस्तान सरकारच्या किंवा मंडळाच्या व भूतपूर्व पाकिस्तानच्या ताब्यातील व अधिपत्याखालील सर्व संपत्ती व मालमत्ता बांगलादेश सरकारकडे हस्तांतरित केली. पश्चिम पाकिस्तानातील लोकांच्या ज्या संपत्ती पूर्व पाकिस्तानात होत्या त्या या निर्बंधान्वये बांगलादेशने ताब्यात घेतल्याच, पण पूर्व व पश्चिम पाकिस्तानने ’शत्रू संपत्ती निर्बंध 1965’ अनुसार भारतीयांची किंवा भारतात स्थलांतरित झालेल्यांची जी संपत्ती ताब्यात घेतली होती, तीसुद्धा बांगलादेश सरकारच्या ताब्यात गेली. बांगलादेश घटनेप्रमाणे भारत शत्रुराष्ट्र नाही. तरीही भारतीयांची किंवा भारतात स्थलांतरित झालेल्यांची संपत्ती बांगलादेश सरकारने ताब्यात घेतली.

पाकिस्तान सरकारने ताब्यात घेतलेली संपत्ती बांगलादेशने त्यांच्या मूळ मालकाला परत केली नाहीच, उलट दिवसेंदिवस त्या संपत्तीच्या यादीमध्ये वाढ करत राहिले. तसेच राज्य अधिग्रहण कार्यालयातील तहसीलदार व इतर कर्मचाऱयांना त्यांच्या संबंधित अधिकारक्षेत्रामध्ये कोणतीही लपवलेली निहित (Vested) संपत्ती शोधून काढली किंवा सादर केली तर त्यास योग्य ते पारितोषिक दिले जाईल, असे घोषित करून एक प्रकारे Vested संपत्ती यादीत नवीन भर घालण्यासाठी प्रोत्साहित करत राहिले.

ढाका विद्यापीठाचे प्रा. अबुल बरकत यांनी ‘An Inquiry into Causes and Consequences of Deprivation of Hindu Minorities in Bangladesh through the Vested Property Act’ या पुस्तकातून Vested Property Act द्वारे हिंदूंच्या जमीन चोरीचे व अन्यायाचे पुराव्यासकट अभ्यासपूर्ण विवेचन केले आहे. या निर्बंधामुळे बांगलादेशातील 40 टक्के हिंदू कुटुंबे बाधित झाली आहेत. त्यात जवळपास 7.5 लक्ष शेतीवंचित कुटुंबे समाविष्ट होती. परिणामी हिंदू कुटुंबांनी गमावलेल्या एकूण जमिनींचा अंदाज 16.4 लक्ष एकर इतका आहे, जी हिंदू समाजाच्या मालकीतील एकूण जमिनीच्या 53 टक्के आहे व बांगलादेशच्या एकूण भूमीच्या 5.3 टक्के आहे.

प्रा. अबुल बरकत यांच्या सर्वेक्षणानुसार, हिंदूंच्या जमिनीची सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी सामुदायिक चोरी केली आहे.

राजकीय पक्ष बेकायदा बळकावलेली भूमी
अवामी लीग 44.2 टक्के
बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी 31.7 टक्के
जातीय पार्टी 5.8 टक्के
जमाते-ए-इस्लामी 4.8 टक्के
इतर 13.5 टक्के

बांगलादेशातील हिंदूंनी या निर्बंधान्वये 2001-2006 या 6 वर्षांतच अंदाजे 22 लक्ष एकर स्थावर व जंगम मालमत्ता गमावली आहे; जे बांगलादेशच्या (त्या वेळच्या सन 2007) सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या (GDP) 50 टकक्यांहून जास्त आहे.

बांगलादेशातील बदललेल्या परिस्थितीत भारताने तेथील सत्ताधारी पक्ष व विरोधी पक्षांशी चांगले संबंध प्रस्थापित करणे आवश्यक आहे. भारताने त्या देशाला मदत करताना सावध राहून अल्पसंख्याक हिंदूंचे संरक्षण होतेय का, हे पाहायला हवे. बांगलादेशात हिंदूंचा छळ झाला तर त्याचे परिणाम भारतासोबतच्या संबंधांवर होतील व ते परराष्ट्र धोरणाच्या दृष्टीने नुकसानकारक आहे, याची जाणीव बांगलादेशला करून द्यायला हवी. तेथील हिंदूंच्या संरक्षणासाठी भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवरून दडपण आणले पाहिजे.