आर्सेनलचे विक्रमी जेतेपद, 14 व्यांदा जिंकली एफए कप फुटबॉल स्पर्धा

355

आर्सेनल फुटबॉल क्लने शनिवारी मध्यरात्री झालेल्या अंतिम लढतीत चेल्सीवर 2-1 अशा फरकाने विजय मिळवला आणि विक्रमी 14व्यांदा एफए कप ही प्रतिष्ठेची फुटबॉल स्पर्धा जिंकण्याची करामत करून दाखवली. या विजयामुळे आर्सेनलला 1995-96 सालानंतर पहिल्यांदाच युरोपा लीगसाठी पात्र होता आले आहे.

आर्सेनलकडून पियरे एमेरिक याने दोन्ही गोल केले. ख्रिस्तियन पुलिसिक याने चेल्सीकडून एकमेव गोल करीत विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले. याआधी 2002 व 2017 या सालांमध्ये आर्सेनल क्लबने चेल्सीला हरवून एफए कप जिंकला होता. मिकेल अर्टेटा हे कर्णधार व मॅनेजर म्हणून एफए स्पर्धा जिंकणारी आर्सेनलची पहिलीच व्यक्ती ठरले हे विशेष.

मँचेस्टर युनायटेड दुसऱया स्थानावर

आर्सेनलने 14 व्या जेतेपदासह पहिले स्थान कायम राखले आहे. मँचेस्टर युनायटेडने एफए कप ही स्पर्धा 12 वेळा जिंकली असून त्यांचा संघ या यादीत दुसऱया स्थानावर आहे. चेल्सी व टोटेनहॅम हे संघ प्रत्येकी आठ वेळा अजिंक्यपदासह संयुक्तपणे तिसऱया स्थानावर विराजमान आहेत.

युवेण्टसचा शेवट कडू, इंटर मिलान दुसऱया स्थानावर

युवेण्टस फुटबॉल क्लबने या वर्षी ‘सीरी ए’ ही इटलीतील मानाची स्पर्धा जिंकली, पण या स्पर्धेतील साखळी फेरीचा शेवट त्यांना गोड करता आला नाही. एएस रोमा या क्लबकडून त्यांना 3-1 अशा फरकाने हार सहन करावी लागली. इंटर मिलानने अखेरच्या लढतीत अटलांटावर 2-0 अशा फरकाने विजय मिळवत गुणतालिकेत दुसऱया स्थानावर झेप घेतली.

आपली प्रतिक्रिया द्या