
>> अभय मिरजकर
पापड, मसाले उद्योग म्हटले की, हा महिलांचा व्यवसाय आहे असे समजले जाते, परंतु मुंबईसारख्या मोठ्या शहरात एमबीएचे शिक्षण घेऊन लातूर येथे यशस्वी पापड उद्योगाची उभारणी करण्याचे धाडसाचे काम धिरज भनगिरे यांनी केले आहे.
धिरज भनगिरे यांनी मुंबई विद्यापीठातून MBA (Marketing) ची पदवी घेतली. ‘ओम लॉजिस्टिक’ या ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये 2016 मध्ये नोकरी करण्यास सुरुवात केली. त्यांनी ट्रान्सपोर्ट व्यवसायातील बारकावे समजून घेतले. पापड निर्यात, पापड मॅन्युफॅक्चरिंग युनिट या संदर्भात माहिती जाणून घेतली. गुजरात व राजस्थान भागातून पूर्ण भारतभर पापड पुरवले जातात. यामुळे त्यांनी पापड उद्योगाची उभारणी करण्याचे ठरवले. नोकरी गरजा पूर्ण करते, पण स्वप्ने पूर्ण करण्यासाठी व्यवसाय सुरू केला पाहिजे. काहीतरी वेगळे करण्याचा ध्यास घेऊन सन 2018 मध्ये नोकरी सोडून 50 हजारांच्या भांडवलातून लातूरमध्ये पापड व्यवसायास सुरुवात केली.
गुजरात, राजस्थान येथे मोठे उद्योग आहेत, उत्पादन अधिक आहे. त्यामुळे कमी भावात ते माल विकतात हे लक्षात घेऊन धिरज यांनी स्थानिक बाजारपेठेत कच्च्या माल मुबलक प्रमाणात मिळत असल्याने पापडाचे विविध प्रकार बनवण्यास प्राधान्य दिले. मातोश्री फुड्स अँड स्पाइसेस हे युनिट सध्या दररोज 300 ते 500 किलो पापड बनवते. या प्लांटद्वारे उडिद, मूग, तांदूळ, पोहा, ज्वारी, बाजरी, नाचणी, बटाटा, भगर, साबुदाणा, हरभरा, गहू इत्यादी प्रकारच्या कच्च्या मालापासून वेगवेगळ्या आकाराच्या व फ्लेवरच्या उच्च प्रतीच्या पापडांची निर्मिती केली जाते. तसेच शेवई, कुरडई, खारोडी, लोणचे, सेंद्रिय हळद, मिरची पावडर अशा अन्य उत्पादनाची त्याला जोड दिली.
उद्योगासाठी महत्त्वाचे असते ते भांडवल. छोट्या प्रमाणात चालणाऱया अन्नप्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी कर्ज देणाऱया योजनांच्या माहितीसाठी कृषी विभागाशी संपर्क साधला. त्यांच्या कामगिरीची दखल घेत, त्यांना ‘महाराष्ट्र बिझनेस आयकॉन 2025’ , ‘महाराष्ट्र स्टाईल आयकॉन 2025’ , ‘महाराष्ट्र फॅशन आयकॉन 2025’ या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. धिरज भनगिरे यांचा उद्योगांचा प्रवास प्रेरणादायी आहे.




























































