
>> दुर्गेश आखाडे
ए आय’ आता पोलिसांसाठी तिसरा डोळा ठरणार आहे. हे प्रत्यक्षात सिद्ध केले आहे रत्नागिरी पोलिसांनी. रत्नागिरी पोलिसांनी एआयचा वापर करून दोन महत्त्वपूर्ण अॅप बनवले आहेत. त्यामध्ये एक अॅप रंगरूप बदलून पोलिसांना गुंगारा देणाऱया गुन्हेगारांना जाळ्यात ओढणारे आहे, तर दुसरे अॅप टंगळमंगळ करणाऱ्या पोलीस अंमलदारांना शिस्त शिकवणारे आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी पोलीस दलात पारदर्शकता, कार्यक्षमता आणि सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने मिशन प्रोजेक्ट आणि डिजिटल अॅप्लिकेशन सुरू केले आहे. एआयचा वापर करून रत्नागिरी अॅडव्हान्स इंटरग्रेटेड डाटा सिस्टीम म्हणजेच रेडस हे अॅप तयार केले आहे. या अॅपमध्ये दोन टूल आहेत. ज्यामुळे फरार आरोपीचा शोध घेणे सोपे होणार आहे.काही गुह्यातील आरोपी 15 ते 20 वर्षे फरार असतात. त्यानंतर ते वेशभूषा बदलून किंवा वयोमानामुळे त्यांच्या चेहरा आणि शरीरयष्टीत बदल होतात. अशा वेळी आरोपी शोधणे कठीण होते. अशा आरोपींचा शोध ‘रेडस अॅप’ वेगळ्या पद्धतीने घेणार आहे. फरार आरोपींची छायाचित्रे या अॅपमध्ये अपलोड केली जाणार आहेत. ते छायाचित्र 108 वेगवेगळ्या वेशभूषेत रूपांतरित केले जाणार आहे. त्यामुळे त्या आरोपीने वेशांतर केले तरी तो पकडता येणे सोपे होणार आहे. दुसरे अॅप आहे ते ‘बंदोबस्त अॅप.’ कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात येतो. मात्र अनेक वेळा बंदोबस्तांवरील पोलीस अंमलदार जागेवर उपस्थित नसतात.अशा टंगळमंगळ करणाऱया अंमलदारांवर आता वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांची ए‘आय’वरून नजर राहणार आहे. रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी एआय तंत्रज्ञानाचा वापर करून बंदोबस्त अॅप तयार केले आहे. या अॅपवरून बंदोबस्त लावला जाणार आहे. बंदोबस्ताच्या ठिकाणावरून पोलीस इकडे-तिकडे गेल्यास तत्काळ त्या अंमलदाराचे रिपोर्टिंग होणार आहे. हे बंदोबस्त अॅप लॉगिन केल्यावर त्या अंमलदाराचे ठिकाण, वरिष्ठ अधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना पाहता येणार आहे. रत्नागिरी जिह्यात सध्या 1 हजार 481 पोलीस हे बंदोबस्त अॅप वापरत आहेत. बंदोबस्ताचे ठिकाण सोडून पोलीस अंमलदार अन्य ठिकाणी गेल्यास त्याचा अलर्ट वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांना मिळणार आहे. या अॅपमुळे पोलीस दलात शिस्त येणार आहे.




























































