
>> राहुल गोखले
भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ वीरभद्रन रामनाथन हे भूविज्ञान क्षेत्रासाठीच्या प्रतिष्ठेच्या क्राफोर्ड पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. रॉयल स्वीडिश अकॅडेमीतर्फे देण्यात येणाऱया या पुरस्काराला नोबेल पुरस्काराच्या समकक्ष मानले जाते.
जागतिक हवामान बदल आणि तापमान वाढ हे एक मोठे संकट असल्याची जाणीव आता जगभरात जागृत झालेली असली तरी काही वर्षांपूर्वीपर्यंत या समस्येकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नसे. अशा काळात या येणाऱया संकटाकडे वीरभद्रन रामनाथन यांनी जगाचे लक्ष प्रथम वेधले. कार्बन डायऑक्साईड हा वायू हरितगृह परिणाम करतो (ग्रीनहाऊस इफेक्ट) म्हणजेच तापमानवाढीस हातभार लावतो असा समज दृढ असण्याच्या काळात त्या वायुपेक्षा कितीतरी पटींनी शीतकरण (रेफ्रिजरेशन) यंत्रणांमध्ये वापरण्यात येणारी क्लोरोफ्लुरोकार्बन्स गटातील रसायने धोकादायक आहेत याचे गणित रामनाथन यांनी मांडले. तेच रामनाथन आता भूविज्ञान क्षेत्रासाठीच्या प्रतिष्ठेच्या क्राफोर्ड पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. रॉयल स्वीडिश अकॅडेमीतर्फे देण्यात येणाऱया या पुरस्काराला नोबेल पुरस्काराच्या समकक्ष मानले जाते. वयाची ऐंशी वर्षे ओलांडलेले रामनाथन आता कॅलिफोर्नियात वास्तव्य करीत असले तर ते भारतीय वंशाचे असल्याने भारतीयांना त्यांच्या झालेल्या या ‘जीवन गौरवाचा’ अभिमान वाटल्याखेरीज राहणार नाही.
रामनाथन यांचे आयुष्य हे अनेकदा कलाटणी मिळालेल्या घडामोडींनी घडले आहे. त्यांचा जन्म मदुराईमध्ये झाला, पण त्यांचे कुटुंब प्रथम चेन्नई व बंगळुरूला स्थलांतरित झाल्याने रामनाथन यांचे शालेय शिक्षण बंगळुरू येथे झाले. पुढे ते अन्नामलाई विद्यापीठातून अभियांत्रिकी शाखेतून पदवीधर झाले आणि एका रेफीजरेटर उत्पादन करणाऱया कंपनीत नोकरीस लागले. शीतकरण यंत्रणेत वापरण्यात येणाऱया कॉम्प्रेसरचे घटक व्यवस्थित कार्यरत आहेत याची आणि त्यातून वायूंची गळती होत नाही ना हे तपासण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती, पण नोकरीत आव्हानात्मक काही नव्हते आणि त्यांनी नोकरीस रामराम ठोकून उच्च शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. प्रथम बंगळुरूस्थित ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’मधून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले. नंतर ते अमेरिकेस रवाना झाले. तेथे डॉक्टरेट करण्यासाठी त्यांनी न्यूयॉर्क शासकीय विद्यापीठात नोंदणी केली. मात्र त्यांचे पीएच.डी.चे मार्गदर्शक प्रा. रॉबर्ट सेस यांचा तोवर अभियांत्रिकी विषयांतील रस संपला होता आणि त्यांना मंगळ व शुक्र या ग्रहांवरील वातावरणाच्या संशोधनात स्वारस्य निर्माण झाले होते. रामनाथन यांचा निरुपाय झाला. त्यांना त्याच विषयात संशोधन करावे लागले. मात्र त्याचा फायदा असा झाला की, पीएच.डी. झाल्यानंतर त्यांना थेट ‘नासा’मध्ये नोकरी मिळाली.
पृथ्वीच्या वातावरणातील ओझोनच्या होत जाणाऱया क्षयाचा अभ्यास करण्याच्या प्रकल्पात ते सामील होते. त्याच वेळी त्यांच्या वाचनात पुढे नोबेल पुरस्काराचे मानकरी ठरलेले मारिओ मोलिना, एफ शेरवूड रोलँड व पॉल क्रुटझेन यांनी लिहिलेला एक शोधनिबंध आला. क्लोरोफ्लोरोकार्बन्समुळे ओझोनचा क्षय होतो असा निष्कर्ष या त्रयीने मांडला होता. या रसायनांचा परिचय रामनाथन यांना ते भारतात रेफ्रिजरेटर कंपनीत काम करीत असताना झालेला होता. त्या शोधनिबंधाने या सर्वच विषयाकडे बघण्याची त्यांची दृष्टी बदलून गेली. ‘नासा’मध्ये कार्यरत असल्याने दिवसा ते व्यग्र असत, पण संध्याकाळी व रात्री ते यावरील गणिते कागदावर मांडू लागले, आपणच काढलेले निष्कर्ष स्वत पुनः पुन्हा तपासून पाहू लागले. पुरेशी खातरजमा झाल्यावर 1975 मध्ये त्यांनी ‘सायन्स’ या नियतकालिकाकडे एक शोधनिबंध पाठवला. त्यांच्या या शोधनिबंधाने खळबळ माजली.
रामनाथन यांच्या संशोधन कार्याने हवामान बदलाच्या वैज्ञानिक आकलनाला केवळ बळ दिले नाही, तर जागतिक पातळीवरील धोरणांवरही खोल परिणाम घडवला. हवामान बदल रोखण्यात महत्त्वाचा ठरलेला ‘मॉन्ट्रियल प्रोटोकॉल’सारखा ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय करार अधिक प्रभावीपणे राबवला गेला तो रामनाथन यांच्या संशोधनामुळेच. हिंद महासागरातील ‘एशियन ब्राऊन क्लाऊड‘वरील त्यांच्या संशोधनामुळे एरोसोल्ससारख्या हवामान प्रदूषकांचा मान्सून, शेती, आरोग्य आणि तापमानवाढीवर होणारा परिणाम स्पष्ट झाला. याचा प्रभाव अनेक विकसनशील देशांच्या वायू प्रदूषण नियंत्रण, स्वच्छ इंधन आणि नवीकरणीय ऊर्जेच्या धोरणांवर दिसून येतो. विज्ञान, धोरण आणि नैतिक जबाबदारी यांचा संगम घडवून आणणारे रामनाथन यांचे योगदान जागतिक हवामान कृतीस प्रेरणादायी ठरले यात शंका नाही.
वीरभद्रन रामनाथन यांनी विज्ञानाच्या जोरावर जगाला विनाशाच्या उंबरठ्यावरून परत आणले. कॅलिफोर्नियात वास्तव्याला असले तरी भारतीय वारसा लाभलेल्या या महान शास्त्रज्ञाने आपल्या कार्यातून अवघ्या मानवजातीसमोर एक सुरक्षित भविष्याचा मार्ग प्रशस्त केला यात शंका नाही.
(लेखक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक आहेत.)
क्लोरोफ्लोरोकार्बन्सवर बंदी घालण्यात आली नसती तर काय झाले असते याचा अभ्यास काही संशोधकांनी ‘नेचर’ या नियतकालिकात 2021 मध्ये प्रकाशित केला. त्यानुसार ओझोन थराचे आवरण पुरते असतेच असे नाही, तर जागतिक तापमान आतापेक्षा अधिकच्या 2.5 सेल्सियसने असते. ते टळले याचे निखालस श्रेय रामनाथन यांनी निगुतीने केलेल्या संशोधनाचे. भारतातून स्थलांतरित झालेल्या रामनाथन यांनी अमेरिकेत आपला लौकिक निर्माण केला. 1976 मध्ये अमेरिकेतील ‘नॅशनल सेंटर फॉर ऍटमॉसफियरीक रिसर्च’ संस्थेत ते दाखल झाले. तेथे रोलँड मॅडन यांच्याबरोबर संशोधन करून त्यांनी सन 2000 मध्ये जागतिक तापमानवाचे संकेत मिळू लागतील असा इशारा 1980 मध्ये दिला होता, तोही तंतोतंत नाही तरी बऱयाच अंशी खरा ठरला. कारण 2001 मध्ये तसे संकेत मिळू लागले. रामनाथन यांनी हिंद महासागरात अवाय प्रयोग केला, ज्यांत दोनशे शास्त्रज्ञ सामील झाले होते. अन्यही अनेक प्रकल्पांवर रामनाथन यांनी केवळ काम केले असे नाही तर त्याचे नेतृत्व केले. जागतिक हवामान बदल, तापमानवाया संकटांवरील संशोधनातील अधिकारी व्यक्ती असा लौकिक त्यांनी मिळविला.


























































